मस्त गुलाबी थंडी आणि त्यात तांदळाची भाकरी आणि पिठले, भाजणीचे वडे, घावन.. झालेच तर सोलकढी, गुळाची पोळी, गोड शिरा आणि त्याउपर उकडीचे मोदक आणि साजुक तुपाची धार असा मस्त बेत चिपळूण साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने ठरवला आहे. ‘पोटपूजा’ झाल्यानंतरच ‘सरस्वतीची पूजा’ प्रभावीपणे होते हा समज अधिक दृढ करण्याचा चंगच संयोजन समितीने बांधला आहे.
संमेलनाच्या तीन दिवसांचे जेवण आणि नाश्त्यामध्ये खास कोकणी पदार्थ ठेवण्यात येणार आहेत. यात उकडीचे मोदक, सोलकढी, गुळाची पोळी, तांदुळाची भाकरी आणि पिठले, भाजणीचे वडे, घावन, गोड शिरा असे खास कोकणी पदार्थ देण्यात येणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्या भागात होते, त्या भागातील प्रसिद्ध आणि खास वैशिष्टय़ असलेले पदार्थ निमंत्रित व सशुल्क नोंदणी केलेल्या प्रतिनिधींसाठी ठेवण्यात येतात. संमेलनासाठी बाहेरून आलेल्या अभ्यांगताना त्या प्रदेशातील खास पदार्थ मिळावेत, हा उद्देश त्यामागे असतो. त्यामुळे चिपळूण संमेलनातही खास कोकणी पदार्थ ठेवण्यात आले असल्याची माहिती संमेलनाच्या भोजन समितीचे प्रमुख केतन रेडीज यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. सुमारे दोन हजार मान्यवर, निमंत्रित आणि सशुल्क नोंदणी केलेल्या प्रतिनिधींची व्यवस्था येथे केली जाणार असून कोकणातील या पदार्थाची प्रसिद्धी व्हावी आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचावेत, हा उद्देश या मागे असल्याचेही रेडीज यांनी सांगितले.