पंजाब येथील घुमान येथे ३ ते ५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जेवण आणि नाश्ता यामध्ये खास गोड पदार्थ साहित्यप्रेमी आणि रसिकांना चाखायला मिळणार आहेत. तीन दिवसांच्या संमेलनात रवा आणि बेसन लाडू, बालुशाही, खोबरा पाक, सोनपापडी, दुधी हलवा, मोहनथाळ, काजूकतली, अशा गोड पदार्थाची मेजवानी आहे. तसेच मधुमेहींसाठी खास साखरविरहित गोड पदार्थही ठेवण्यात येणार आहेत.      
या साहित्य संमेलनासाठी मुंबई आणि नाशिक येथून दोन विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. घुमानवारीसाठी या रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या साहित्यप्रेमी व रसिकांना दोन दिवसांच्या प्रवासात खास मराठमोळ्या पदार्थाची मेजवानी मिळणार आहे.
या गाडीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह साहित्य संमेलनासाठी पूर्वनोंदणी केलेले साहित्य रसिकही असणार आहेत. या दोन दिवसांच्या प्रवासात केशर शिरा, मिसळ पाव, जिलेबी, श्रीखंड, गुलाबजाम, पालक व मूगभजी, मसालेभात असे पदार्थ जेवण आणि नाश्त्यामध्ये असणार आहेत.  
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून १ एप्रिल रोजी संत नामदेव एक्स्प्रेस तर नाशिक येथून श्री गुरुनानकजी एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे.