२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्यानंतर या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने एनआयएच्या विशेष न्यायालयात केलेला जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आला. या निकालामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.
साध्वी हिच्याविरोधात पुरावे नसल्याचा ‘एनआयए’ने पुरवणी आरोपपत्राद्वारे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याआधारे ती जामिनास पात्र असल्याचा दावा तिच्या जामीन अर्जात करण्यात आला आहे. शिवाय बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला, ती तिच्या नावे नोंद असली तरी ती फरारी आरोपी रामचंद्र कालसंगरा याच्या ताब्यात होती. त्यामुळे त्याच्या कृत्यांचे खापर तिच्या माथी मारता येऊ शकत नाही, असा दावाही अर्जात करण्यात आला होता. पण निसार अहमद सय्यद बिलाल या व्यावसायिकाने प्रज्ञासिंह हिच्या जामिनाला विरोध करणारा अर्ज न्यायालयात केला होता. ‘जमात-ए-उलेमा महाराष्ट्र’ या संस्थेच्या माध्यामातून त्याने ही मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर साध्वी प्रज्ञासिंहचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.