गायींच्या नैसर्गिक चक्रानुसार टप्प्याटप्प्याने कार्यक्रम राबवणार; गर्भधारणा प्रक्रियेत गुंतागुंत होण्याच्या भीतीने अखेर केंद्राचे निर्देश

गांधी जयंतीदिनी राज्यातील तब्बल दहा हजार गायींना अनैसर्गिक पद्धतीने माजावर आणून गर्भदान करण्याऐवजी गायींच्या नैसर्गिक ऋतुचक्राप्रमाणे पुढील तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम राबवण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या कार्यक्रमात हार्मोन्समुळे गायींच्या गर्भधारणा क्षमतेवर परिणाम झाल्याने एकाच दिवसातील या कृत्रिम रेतनाच्या अट्टहासाबद्दल अनेक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली होती. त्यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते.

एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील गायींना हार्मोन्स देऊन नैसर्गिक गर्भधारणा प्रक्रियेत गुंतागुंत होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा कार्यक्रम एकाच दिवशी न राबवण्याचा निर्णय राज्यस्तरावर घेण्यात आला. राज्याच्या भूमिकेची केंद्र पातळीवरही दखल घेण्यात आली व एकाच दिवशी कृत्रिम रेतन करण्याऐवजी पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्राने परवानगी दिली. त्यानुसार आता गांधी जयंतीदिनी सरसकट सर्व गायींना कृत्रिम गर्भदान केले जाणार नाही.

हार्मोन्समुळे गायींच्या बीजधारणा क्षमतेवर परिणाम होत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे बाहेरून हार्मोन्स न देता, नैसर्गिकरीत्या माजावर येत असलेल्या गायींनाच कृत्रिम रेतन करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार २ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम होईल, असे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त  कांतीलाल उमप यांनी सांगितले.

जिल्हास्तरावरून सरासरी तीनशे याप्रमाणे आतापर्यंत सुमारे आठहजार गायींची माहिती गोळा करण्यात आली आहे. गणेशोत्सवामुळे कोकणातील गायींची माहिती अजून पोहोचलेली नाही. गावरान तसेच प्रजाती निश्चित न झालेल्या देशी गायींना त्यांच्या ऋतुचक्राप्रमाणे कृत्रिम रेतन केले जाईल. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत मात्र गांधी जयंतीदिनी कृत्रिम रेतनाचा कार्यक्रम होईल, असे पशुसंवर्धन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

शुद्ध देशी व गावरान गायींची संख्या वाढवण्यासाठी देशभरातील दोन लाख गायींना एकाच दिवशी कृत्रिम गर्भधारणा करण्याचा कार्यक्रम केंद्रीय पातळीवर आखण्यात आला. त्यानुसार राज्याला गांधी जयंतीदिनी दहा हजार गायींचे कृत्रिम रेतन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.

  • कृत्रिम रेतन ही पद्धती प्रचलित असली तरी एकाच दिवशी दहा हजार गायींना माजावर आणण्यासाठी हार्मोन्स देणे आवश्यक होते. १६ वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनेगर्भधारणेच्या प्रक्रियेतच गुंतागुंत होत असल्याचा अनुभव होता.
  • अशा प्रकारे इंजेक् शन दिल्यावर काही गायींची गर्भधारणेची प्रक्रिया विस्कळीत झाली व त्यानंतर त्या गायींना दुसरा गर्भ राहण्यात अडचणी आल्या. मात्र या समस्येचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात आला नाही.