नववर्षांच्या स्वागत पार्टीत राज्याचा महसूल बुडवून आणलेला बनावट देशी वा विदेशी मद्याचा पुरवठा होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. प्रसंगी अचानक तपासणी करण्याचे आदेशही काही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्यभरात जाऊन अचानक तपासणी करण्याच्या पद्धतीमुळे मद्यतस्करीला आळा बसेल, असा विश्वास राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.
या विभागाने नोव्हेंबरअखेरपर्यंत बनावट देशी मद्याचा सुमारे सहा लाख लीटर्स तर विदेशी मद्याचा सुमारे साडेसात लिटर्स साठा हस्तगत केला आहे. मुंबईत केलेल्या कारवाईत विदेशी ब्रँडेड कंपनीच्या स्कॉच तयार करण्यासाठी वापरलेली पद्धत फारच भयानक आणि घातक असल्यामुळेच बनावट मद्यविरोधी मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी गोवा, दमण परिसरातून मोठय़ा प्रमाणात मद्यसाठा मागविला जातो. उत्पादन शुल्क चुकवून आलेला हा साठा काही वेळा बनावटही असू शकतो. त्यामुळेच गोवा आणि दमणमधून  राज्यात येणाऱ्या सर्व महामार्गावरील तपासणी नाके अधिक सक्षम करण्यात आल्याची माहितीही डॉ. मुखर्जी यांनी दिली. उत्पादन शुल्क विभागाचे संचालक प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्त्वाखाली बनावट देशी व विदेशी मद्य रोखण्यावर खास भर देण्यात आला आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन हजार ५३१ गुन्हे दाखल करून १७५५ जणांना अटक केली आहे. हातभट्टीसाठी वापरले जाणारे सुमारे एक लाख ३१ हजार लीटर्स इतके रसायनही हस्तगत केले आहे, अशी माहिती सुर्वे यांनी दिली. अवैध हातभट्टीकडे मोठय़ा प्रमाणात लक्ष पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नववर्षांच्या स्वागत पार्टीत मोठय़ा प्रमाणात तस्करी करून मद्य पुरविले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्याचा महसूल बुडत असतो तसेच तस्करीच्या मद्य घातकही ठरू शकते. त्यामुळे केवळ महसूल मिळविणे हे आमचे उद्दीष्टय़ नसून ग्राहकाला चांगले मद्य मिळावे, अशी आमची इच्छा आहे
– डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क

मद्याच्या मागणीत वाढ
भारतीय बनावटीचे विदेशी तसेच थेट विदेशातून आयात केलेले मद्याची नोव्हेंपर्यंत ११५ लाख लीटर्स विक्री झाली आहे. ही विक्री गेल्यावर्षीपेक्षा ८४ लाख लीटर्सनी अधिक झाली आहे. बीअर आणि वाईनच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नोव्हेंबरपर्यंत दोन हजार ५३ लाख लीटर्स बीअरची तर ३० लाख लीटर्स विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत बीअर आणि वाईनच्या मागणीत अनुक्रमे १२० लीटर्स आणि साडेपाच लाख लीटर्सने वाढ झाली आहे.