मुंबईत डेंग्यू, हिवतावाचा प्रादुर्भाव

मुंबईमधील काही परिसरात डेंग्यु आणि हिवतापाच्या रुग्णांची संख्या लाढत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही विभागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कीटकनाशक आणि धूम्रफवारणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून जनतेला करण्यात आले आहे.

मुंबईमधील दाणाबंदर परिसरात हिवतापाचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून  आले आहेत. तसेच अन्य काही भागात डेंग्यु व हिमतापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेच्या कीटकनाशक विभागाने ठिकठिकाणी प्रभावीपणे कीटकनाशक आणि धूम्रफवारणी करण्यास सुरुवात केली आहे. दाणाबंदर परिसरात व्यापक प्रमाणावर कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत असून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदामांमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदामांमधील छपरांच्या पन्हाळीमध्ये पाणी साचत असून त्यात डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे या पन्हाळीमध्ये कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर कीटकनाशकांची फवारणी केल्याची माहिती कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

उंचावर असलेल्या पन्हाळीमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी पालिकेच्या शिडीयुक्त वाहनांचा वापर करण्यात आला. दाणाबंदर परिसरात २५ मोठय़ा पन्हाळी असून लवकरच या पन्हाळींमध्ये कीटकनाशकाची फवारणी करुन डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली जातील, असे ते म्हणाले.