बस अस्वच्छ दिसल्यास संबंधित अधिकाऱ्याला १०० रुपये दंड

एसटी म्हटले की, लाल-पिवळी गाडी, त्यात जुनाट आसने, तुटलेल्या खिडक्या, खच्चून भरलेले सामान आणि घाणींचे साम्राज्य अशी सर्वसाधारण प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. या प्रतिमेला छेद देण्यासाठी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एसटी बस अस्वच्छ असल्यास संबंधित अधिकाऱ्याला १०० रुपये दंड होणार आहे. मात्र, एसटीच्या ताफ्यातील सुमारे १८,६११ गाडय़ांची सफाई करण्यासाठी केवळ १४५० स्वच्छकच कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

राज्यभरात एसटी महामंडळाची एकूण ५८८ बस स्थानके, २५२ बस आगार आहेत. यातून रोज १८ हजारांहून अधिक बस चालवल्या जात असून या गाडय़ांनी वर्षभरात सरासरी २५० कोटी प्रवासी प्रवास करतात. मात्र, कोटय़वधी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटीच्या बसची स्वच्छता अवघ्या १४५० स्वच्छकांच्या खांद्यावर असल्याचे समोर आले आहे. यात ५८ आगारांत बस धुलाई मशीन कार्यरत असून २४ आगारांत अशा धुलाई मशीन बसवण्याचे नियोजन आहे. तसेच ६ आगारांत बाहेरील संस्थेमार्फत बस गाडय़ा स्वच्छ करण्याचे काम केले जाते. मात्र, प्रवाशांची संख्या आणि बसगाडय़ांची संख्या पाहता स्वच्छकांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एका स्वच्छकावर किमान १० बस गाडय़ांच्या सफाईची जबाबदारी येत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

संख्या वाढविण्याची मागणी

१६ जुलैला ‘वाहतूक त्रिसूत्री’ या संकल्पनेवर एसटी महामंडळाची बसगाडी अस्वच्छ असल्यास पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांना १०० रुपये दंड करण्याचे आदेश वरिष्ठांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. स्वच्छतेची जबाबदारी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांची असल्याचे अधोरेखित करून सांगणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छकांची संख्या वाढवावी अशी मागणी केली आहे.

स्वच्छतेच्या कामासाठी अनुकंपा तत्त्वावरील महिलांचीच संख्या एक हजारांच्या पुढे आहे. एसटी महामंडळाकडून स्वच्छतेच्या प्रश्नावर विशेष लक्ष दिले जात आहे. सध्या महामंडळाची बस स्थानके, बस गाडय़ा, कार्यालये, चालक-वाहक विश्रांतीगृहे, प्रवासी प्रसाधनगृहे यांची स्वच्छता ही राज्यस्तरावर एकाच बाह्य़ संस्थेला देण्याचा विचार आहे.

– रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक