एसटीपासून फारकत घेतलेल्या प्रवाशांना पुन्हा एकदा आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ‘एक दिवस, एक उद्दिष्ट’ हा अभिनव उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाचा मुख्य भार एसटीने ठरवलेली काही महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्यावर आहे. ही उद्दिष्टे दर दिवशी नाही, तरी किमान आठवडय़ातून एकदा १०० टक्के गाठावीत, असा एसटीचा प्रयत्न आहे. या उपक्रमांतर्गत आठवडय़ातील प्रत्येक दिवसाचे एक उद्दिष्ट ठरवून दिले असून ते पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
सध्या एसटीच्या इतिहासातील सर्वात खडतर काळ सुरू आहे. कधी नव्हे इतके कमी प्रवासी एसटीचा वापर करत आहेत. एसटीचे प्रवासी भारमान ५४ टक्के एवढे खालावले आहे. असे असताना प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एसटीने ‘एक दिवस एक उद्दिष्ट’ हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. हा उपक्रम सोमवारपासून राज्यातील सर्व एसटी आगारांत सुरू होणार आहे.
या उपक्रमांतर्गत दर सोमवारी ‘नियतवेळ दिवस’ जाहीर करण्यात आला आहे. या दिवशी सर्व बसगाडय़ा वेळेवर सोडण्याचे उद्दिष्ट एसटीने आखले आहे. या दिवशी एकही फेरी रद्द होणार नाही, याकडे एसटी प्रशासन लक्ष देणार आहे. मंगळवारचा दिवस ‘प्रवासी तक्रार आणि प्रवासी सत्कार दिवस’ असेल. या दिवशी प्रवाशांच्या तक्रारी स्वीकारून त्यांचे त्वरित निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेच्या व मासिक, त्रमासिक व वार्षिक पासधारकांचा सत्कार केला जाणार आहे.
बुधवार व गुरुवार हे दिवस अनुक्रमे कर्मचारी दिवस आणि कर्मचारी सत्कार यांसाठी ठेवण्यात आले आहेत. दर बुधवारी कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आगार पातळीवर त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल. तसेच महामंडळाच्या सद्यस्थितीबद्दल प्रवाशांना सविस्तर माहिती करून दिली जाणार आहे. गुरुवारी आठवडाभरात सर्वात जास्त उत्पन्न आणणाऱ्या वाहकाचा आगारनिहाय सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे प्रतिलीटरमागे जादा किलोमीटर गाडी चालवणाऱ्या चालकाचाही सत्कार केला जाईल. महिनाभरातील उत्कृष्ट वाहक आणि चालक यांचाही सन्मान दर गुरुवारी करण्यात येणार आहे. शुक्रवारी एसटीच्या प्रत्येक आगारात स्वच्छता दिन पाळण्यात येईल. या दिवशी महामंडळाच्या सर्व बसगाडय़ा आंतर्बाह्य स्वच्छ असल्याची खात्री करूनच सोडण्यात येतील. तसेच बसस्थानक व प्रसाधनगृहे यांची काटेकोरपणे स्वच्छता केली जाईल. शनिवारी एकही बस नादुरुस्त राहणार नाही याची काळजी घेऊन विना मार्गबंद दिवस साजरा करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक अवस्था सध्या अत्यंत नाजूक आहे. मात्र आर्थिक तूट भरून काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे एसटीपासून दुरावलेले अनेक प्रवासी पुन्हा एसटीलाच पसंती देतील, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला.