उन्हाळी हंगाम म्हणजे एसटीच्या कमाईचा हंगाम, हे समीकरण यंदाच्या उन्हाळी हंगामाने मोडीत काढले असून यंदाच्या उन्हाळी हंगामात एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत दोन टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. एसटीच्या उन्हाळी हंगामासाठी नियोजनाचा अभाव तसेच गाडय़ांची कमतरता या अंतर्गत बाबींचा फटका तर एसटीला बसला आहेच. पण त्याचबरोबर उन्हाळी हंगामात सक्रीय होणारे खासगी वाहतूकदारही एसटीच्या प्रवाशांना आपल्याकडे वळवत आहेत. एसटीच्या महाराष्ट्रातील सर्व सहा विभागांमध्ये प्रवासी संख्या घटल्याचे समोर येत आहे.
एसटीचा उन्हाळी हंगाम १ एप्रिलपासून सुरू होतो. या उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियोजन बैठक एक ते दीड महिना आधीच होणे अपेक्षित असते. मात्र दोन महिन्यांपासून एसटीसाठी पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालकांची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे एसटीचा सर्व कारभार उपमहाव्यवस्थापक  पदाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. या अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने उन्हाळी हंगामासाठी कशा प्रकारे नियोजन केले जावे, यात एकसूत्रता नाही. परिणामी यंदाच्या उन्हाळी हंगामात एसटीला नियोजनाच्या अभावाचा फटका बसत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
एप्रिल महिन्यात शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्या की, आपापल्या गावी जाण्यासाठीची आरक्षणे आगाऊ नोंदवलेली असतात. मात्र यंदा निवडणुकांच्या तारखा, तसेच शालेय परीक्षांबाबतची अनिश्चितता यामुळे आगाऊ आरक्षणात घट झाली होती. तसेच एसटीकडे गाडय़ांची कमतरता असून चालू स्थितीत असलेल्या गाडय़ांची अवस्थाही वाईट आहे. एसटीची शिवनेरी सेवा ही महामंडळासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. मात्र शिवनेरीच्या अनेक गाडय़ांची स्थितीही खूपच बिकट आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणात, विदर्भात, मराठवाडय़ात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेशा बसगाडय़ा नसल्याचा फटका बसत आहे. या गाडय़ांचे नियोजनही योग्य प्रकारे नसल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.
या दोन कारणांप्रमाणेच खासगी वाहतूकदारही एसटीसमोरची नेहमीची डोकेदुखी आहे. या उन्हाळी हंगामात एसटीच्या नियोजनाचा बोऱ्या वाजल्याने खासगी वाहतूकदारांनी एसटीच्या प्रवाशांना आपल्याकडे आकृष्ट करण्यास सुरुवात केली आहे. एसटीच्या दरांपेक्षा जास्त दर असूनही प्रवासी खासगी बसगाडय़ांचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे.

वर्षभरात पाच कोटी प्रवासी घटले
२०१२-१३ या आर्थिक वर्षांत एसटीच्या प्रवाशांची संख्या ६०.४६ टक्के एवढी होती. म्हणजेच या आर्थिक वर्षांत एकूण २६१.३७ कोटी तिकिटांचा खप झाला होता. मात्र ही संख्या २०१३-१४ या आर्थिक वर्षांत तब्बल पाच कोटींनी घसरली. एसटीचे प्रवासी भारमान १३-१४ या आर्थिक वर्षांत ५८.५० टक्के एवढे होते. या आर्थिक वर्षांत एकूण २५६.३० कोटी तिकिटांची विक्री झाली.
१ एप्रिल ते १० मे या दरम्यानचे प्रवासी भारमान (टक्क्यांमध्ये)
विभाग    २०१३    २०१४    घट
औरंगाबाद    ६२.८४    ६०.२९    २.५५
मुंबई    ६६.०४    ६३.०१    ३.०३
नागपूर    ५९.७७    ५८.५८    १.१९
पुणे     ६०.३५    ५९.४०    ०.९५
नाशिक    ६१.६८    ५९.९६    १.७२
अमरावती    ६०.०२    ५७.६१    २.४१
एकूण    ६१.९४    ६०.०४    १.९०