मुंबई, ठाण्यातून कोकणासाठी २२५० जादा फेऱ्या

कोकणात जाणाऱ्या नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज झाल्याची ग्वाही एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली. गणेशोत्सवादरम्यान कोकणाबरोबरच इतर महाराष्ट्रभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळाने ठिकठिकाणाहून जादा बसगाडय़ांचे नियोजन केले आहे. त्याशिवाय मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथून महामंडळाने २२५० जादा फेऱ्यांचे नियोजन केले असून त्यापैकी २०५२ फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहितीही एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.

यंदा गणेश चतुर्थी सोमवारी आली असल्याने शुक्रवारपासूनच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची रीघ वाढणार आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने नियोजन केले आहे. महामंडळाला सर्वाधिक गर्दी शनिवार, ३ सप्टेंबर रोजी अपेक्षित आहे. त्या दिवसापासून पाच तारखेपर्यंत प्रत्येक आगारात आणि मोठय़ा बस स्थानकात एसटीचे अधिकारी तैनात असतील. तसेच ३ व ४ सप्टेंबर या दोन्ही दिवशी मुंबई-ठाणे या परिसरात गर्दीचा अंदाज घेऊन १०० जादा गाडय़ा सोडण्याचे नियोजनही एसटीने केले आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळही एसटीने तयार ठेवले आहे. कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, खान्देश येथे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय करण्यासाठीही एसटीने नियोजन केले असून पुण्याहून पश्चिम महाराष्ट्रासाठी ३ आणि ४ सप्टेंबर रोजी जादा बसगाडय़ांची सोय केली आहे.

गरज भासल्यासच पर्यायी बसमार्ग

मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. खड्डय़ांमुळे या रस्त्याची चाळण झाली असून महाड येथील दुर्घटनेनंतर हा मार्ग एवढय़ा प्रचंड वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही, याबाबत साशंकता आहे. तरीही एसटीने नियोजित केलेल्या २२५० जादा फेऱ्या या मुंबई-गोवा महामार्गावरूनच जाणार आहेत. पण या मार्गावर खासगी वाहने, खासगी बसगाडय़ा आदींची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली, तरच पर्यायी मार्गाचा विचार होणार आहे. जादा फेऱ्यांच्या बहुतांश गाडय़ा समूहाने आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना विचारूनच या गाडय़ा मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील. या मार्गामुळे अंतरात साधारण १०० किलोमीटरची भर पडते. तसेच एका बसगाडीमागे १०४७ रुपये जादा लागतात. त्यामुळे एसटी महामंडळाचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

सुरक्षा आणि मदत

गणेशोत्सवादरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी महामंडळाचे मनुष्यबळ महामार्गावरही सज्ज राहणार आहे. मुसळधार पाऊस किंवा तांत्रिक बिघाड यांमुळे एखादी गाडी बिघडली, तर एसटीच्या मोबाइल ब्रेकडाउन गाडय़ा प्रत्येक २०० किमीच्या परिसरात तैनात करण्यात येणार आहेत.