‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या आणि १२०० कोटी रुपयांच्या संचित तोटय़ात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांची छबी आणि त्यांचे नाव सध्या महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच गायब झाले. आघाडी सरकारच्या काळात महामंडळावर नेमणूक झालेले अध्यक्ष जीवनराव गोरे अजूनही एसटी अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत आहेत. मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर अचानक महामंडळाच्या संकेतस्थळावरून गोरे यांचे नाव आणि त्यांचे छायाचित्र गायब झाल्याने सध्या चर्चा रंगली आहे.
विविध महामंडळांवर अध्यक्षांची नेमणूक सरकारतर्फेच होते. आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जीवनराव गोरे यांची नेमणूक राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी झाली होती. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात गोरे यांनी हे पद केवळ नाममात्र न भूषवता एसटी महामंडळाला फायद्यात आणण्यासाठी कामही केले आहे. मात्र त्यांनी केलेल्या घोषणा केवळ आश्वासनांच्याच पातळीवर राहिल्याने त्यांच्यावर टीकाही झाली आहे.
सत्ताबदल झाल्यानंतर अद्याप तरी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी इतर कोणाचीही नेमणूक झालेली नाही किंवा तसे संकेतही नव्या मंत्रिमंडळातून आले नाहीत. अध्यक्ष जीवनराव गोरे महामंडळात येऊन कार्यरत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचा संदेश प्रसृत केला असतो. या संदेशाच्या बाजूला त्यांचे छायाचित्र आणि नावही ठळकपणे दिले असते. मात्र सध्या महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अध्यक्षांचे छायाचित्र व नावही गायब आहे. त्याच वेळी व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष संजय खंदारे यांचे नाव व छायाचित्र व्यवस्थित झळकत आहे.
46
जीवनराव गोरे हेच अध्यक्षपदी आहेत. मात्र, संकेतस्थळावरून त्यांचे नाव व छायाचित्र कसे काढले गेले, याची चौकशी केली जाईल.कदाचित  तांत्रिक कारणांमुळे हा प्रकार घडला असल्याची शक्यता आहे.
संजय खंदारे
व्यवस्थापकीय संचालक