शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मध्यस्थी केली आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये सुरु असलेल्या संपामुळे राज्यभरात प्रवाशांचे हाल सुरु आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांकडून आज संप मागे घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा संप मिटल्यावर एसटी संघटनांचे कर्मचारी तसेच नेते मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेणार असल्याचे समजते आहे. याशिवाय संघटनांचे कर्मचारी ‘मातोश्री’ बंगल्यावर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावरुन सरकारला धारेवर धरले होते. माता-भगिनींचे मानधन वाढवा, अशी मागणी त्यावेळी ठाकरेंनी केली होती. त्यामुळे माता-भगिनींसाठी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल गप्प का, असा प्रश्न निर्माण झाला होता. परिवहन खाते शिवसेनेकडे असल्याने उद्धव ठाकरे शांत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर काल उद्धव ठाकरेंनी संपाबद्दल मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांशी संवाद साधत मध्यस्थी केली.

सातवा आयोग लागू करावा, ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय पदनिहाय वेतनश्रेणी देण्यात यावी, वेतनाबद्दल सुधारित करार होत नाही, तोपर्यंत २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, अशाही कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. याच मागण्यांसाठी मंगळवारपासून संपावर आहेत. या संपामुळे ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.