डिझेलच्या दरात झालेली वाढ, सुटय़ा भागांचे भडकलेले दर यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पासच्या दरात ५० ते ७० रुपयांची वाढ करुन प्रवाशांना पुन्हा धक्का दिला. या भाडेवाढीच्या फटका ग्रामीण भागांतील नागरिक आणि पर्यटकांना सोसावा लागणार आहे.
प्रवाशांना स्वस्तात प्रवास करता यावा यासाठी महामंडळाने ही योजना सुरू केली होती. या योजनेत चार आणि सात दिवसांचा पास प्रवाशांना उपलब्ध करण्यात येत होता. तिकीटासोबत आता महामंडळाने हंगामी पासच्या दरातही वाढ केली असून ती ६ जुलैपासून लागू होणार आहे.
साध्या (जलद, रात्रसेवा, शहरी, जनता, मिनी, मिडी) बसमधून चार दिवसांच्या पासवर गर्दीच्या काळात प्रवास करण्यासाठी आता प्रौढांना ६८५ रुपयांऐवजी ७३५ रुपये, तर लहान मुलांना ३४५ रुपयांऐवजी ३७० रुपये मोजावे लागणार आहेत. तर इतरवेळी प्रौढांना ६३५ रुपयांऐवजी ६८० रुपये, तर लहान मुलांना ३२० रुपयांऐवजी ३४० रुपये भरावे लागणार आहेत. निमआराम (हिरकणी) बसमधील प्रवासासाठी गर्दीच्या वेळी प्रौढांसाठी ८५० रुपये (जुना दर ७८५ रुपये), लहान मुलांसाठी ४२५ रुपये (३९५ रुपये), अन्य वेळी प्रौढांसाठी ७८५ रुपये (७२५ रुपये), लहान मुलांना ३९५ रुपये (३६५ रुपये) भरावे लागणार आहेत. तसेच आंतरराज्य (निमआराम, साधी) बसमधून या पासवर गर्दीच्या काळात प्रवास करण्यासाठी ९१५ रुपये, लहान मुलांना ४६० रुपये, तर अन्य वेळी अनुक्रमे ८५० रुपये व ४२५ रुपये मोजावे लागणार आहेत.
साध्या बसमधून गर्दीच्या हंगामात सात दिवसांच्या पासवर प्रवास करण्यासाठी प्रौढांना १२८५ रुपये, लहान मुलांना ६४५ रुपये, अन्य वेळी अनुक्रमे ११८५ रुपये व ५९५ रुपये भरावे लागणार आहेत. निमआराम बसमधून गर्दीच्या वेळी प्रौढांना १४८५ रुपये, लहान मुलांना ७४५, अन्य वेळी अनुक्रमे १३७० रुपये व ६८५ रुपये, तर आंतरराज्य बसमधून गर्दीच्या काळात प्रवास करण्यासाठी प्रौढांना १५९५ रुपये, लहान मुलांना ८०० रुपये, तर इतर वेळी अनुक्रमे १४८५ रुपये व ७४५ रुपये भरावे लागणार आहेत.
तूर्तास ज्यांनी चार आणि सात दिवसांचा हंगामी पास घेतला आहे त्यांच्याकडून वाढीव शुल्क वसूल केले जाणार नाही, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चार आणि सात दिवस एसटीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे.