धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी या समाजाचे राज्यभर आंदोलन सुरू असताना कोळी समाजानेही आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यासाठी बुधवारी शिवाजी पार्क ते सोम्मया मैदानापर्यंत मोच्र्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे, रायगड जिल्ह्य़ांत मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या या समाजातील वीस हजार एसटी कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून ते या मोच्र्यात सहभागी होणार आहेत. या समाजाला भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ अन्वेय १९६७ रोजी अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. यात कोळी समाजातील १६ पैकी महादेव, मल्हार, टोकरे, डोंगर, ढोर या जातींचा समावेश आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही सरकार लक्ष देत नसल्याने आता या समाजाने ‘देता की जाता’ आंदोलन हाती घेतले आहे. राज्यातील ८५ विधानसभा मतदारसंघात कोळी समाज निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असे कोळी महासंघाचे नेते रमेश पाटील म्हणाले.राज्यात या समाजाची संख्या एक कोटी १० लाख असल्याचा दावा केला जात आहे.