भांडवली मूल्याधारित करप्रणालीमध्ये कार्पेटऐवजी बिल्टअप क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र न्यायालयाने दणका दिल्यानंतर पालिका प्रशासनाने नवा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर केला. मात्र आतापर्यंत नव्या प्रणालीनुसार वसूल केलेल्या मालमत्ता करातील अतिरिक्त पैसे परत करण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे प्रशासनाने सादर केलेला नवा प्रस्ताव स्थायी समितीने बुधवारच्या बैठकीत फेटाळून लावला.
नव्या कर प्रणालीनुसार मालमत्ता कर आकारण्यासाठी रेडीरेकनरचा दर विचारात घेण्यात आला. तसेच मालमत्ता कराच्या सूत्रामध्ये बिल्टअप क्षेत्रफळाही समावेश होता. यामुळे नागरिकांना अधिक मालमत्ता कर भरावा लागत होता. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेले आणि या चुकीबद्दल न्यायालयाने पालिकेला दणका दिला. त्यानंतर महापालिकेने मालमत्ता कराच्या सूत्रामध्ये बिल्टअपऐवजी कार्पेट क्षेत्रफळाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.