शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या शिवाजी पार्क मैदानातील जागेवर त्यांचे स्मारक उभारण्याची मागणी शिवसेनेतून तीव्र होत असतानाच सरकारने ही जागा मोकळी करण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव, मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत, सध्या शिवाजी पार्क मैदानावर उभारण्यात आलेला चौथरा हटवण्याची कारवाई करण्याची वेळ आल्यास त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे समजते.
बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथे स्मारक उभारावे, अशी आग्रही मागणी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी केली होती. तसेच शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्कवर उभारण्यात आलेला चौथरा न हटवता त्याला स्मारकाचे स्वरूपही देण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर, शिवसेनेने फारच ताणून धरल्यास शिवाजी पार्क मैदान मोकळे कशा पद्धतीने मोकळे करायचे याबाबत शनिवारी मंत्रालयात बैठक झाली. मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्याकडे झालेल्या बैठकीला मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. कारवाई करायचीच वेळ आल्यास त्या दृष्टीने नियोजन करण्यास पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले आहे.
शिवसेनेने स्मारकाचा विषय प्रतिष्ठेचा केला असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानात शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला विरोध केला. राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली असताना काँग्रेसने मात्र शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला विरोध करीत आपली व्होट बँक नाराज होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. शिवाजी पार्क मैदानात जरी सरकारची इच्छा असली तरी कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता स्मारक उभारणे शक्य होणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.         

पर्यायी जागेचा विचार
शिवाजी पार्कवर सरकारने जबरदस्तीने कारवाई केल्यास त्याचे विपरीत पडसाद उमटू शकतात. यामुळेच सलोख्याने त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मैदानात स्मारक उभारण्यात येणाऱ्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय स्मारकासाठी पर्यायी जागा सुचवण्याचेही सांगण्यात आले आहे. यापैकी वरळी-वांद्रे सागरी पुलाच्या (सी लिंक) वांद्रे टोकाला मोकळ्या जागेत स्मारक उभारण्याचा एक पर्याय विचाराधीन असल्याचेही समजते.