दैनंदिन प्रवासी संख्या ५७वरून ५३ लाखांवर

दिवाळीच्या काळात वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा विचार करून जास्त उत्पन्न कमावण्यासाठी एसटी महामंडळाने केलेली हंगामी दरवाढ प्रवासी भारमानाच्या मुळावर उठली आहे. ही दरवाढ लागू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत एसटीचे प्रवासी भारमान तब्बल सहा टक्क्यांनी खालावले आहे. एसटीची दैनंदिन प्रवासी संख्या ५७ लाख एवढी असते. मात्र गेल्या दोन दिवसांत त्यात चार लाखांची घट झाली आहे. येत्या काळात हा तोटा वाढण्याची शक्यता एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
खासगी वाहतूकदारांशी त्यांच्याच ‘दरात’ स्पर्धा करत एसटी महामंडळाला प्रगतिपथावर नेण्याचा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा निर्णय भलताच अंगलटी येणार असल्याची चिन्हे या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याच्या तिसऱ्याच दिवसापासून दिसू लागली आहेत. एसटीची दर दिवशीची प्रवासी संख्या सरासरी ५७ लाख एवढी असते. मात्र हंगामी दरवाढ झाल्या दिवसापासून प्रत्येक दिवशी सुमारे चार लाख प्रवाशांनी एसटीचा प्रवास टाळला आहे. एसटी महामंडळाने घेतलेल्या या हंगामी दरवाढीमुळे वातानुकूलित सेवांचे दर २० टक्के, निमआराम गाडय़ांचे दर १५ टक्के आणि साध्या बसगाडय़ांचे भाडे १० टक्के एवढे वाढले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे या अंतरासाठी वातानुकूलित बसगाडय़ांसाठी ८५ रुपये, निमआराम गाडय़ांसाठी ३५ रुपये आणि साध्या बसगाडय़ांसाठी १६ रुपये जादा मोजावे लागत आहेत. लांबच्या अंतरासाठी ही रक्कम आणखी जास्त असल्याने प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे नियोजन पुन्हा एकदा फसल्याचे स्पष्ट होत आहे. एसटीचा सध्याचा संचित तोटा २३४४ कोटी रुपये एवढा आहे. हा तोटा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला खरा, पण हा निर्णय लागू केल्यानंतर पुढील दोनच दिवसांत त्याचा फटका महामंडळाला सोसावा लागत आहे.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला एसटी
राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत निधीसाठी आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपले एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर त्यातून जमा होणारे आठ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.