पी१५- बी या भारतीय नौदलाच्या विनाशिका प्रकल्पातील विशाखापट्टणम वर्गातील सर्वात पहिली स्टेल्थ विनाशिका विशाखापट्टणचे जलावतरण नौदलप्रमुखांच्या हस्ते सोमवारी, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास माझगाव गोदीमध्ये होणार आहे.
स्टेल्थ फ्रिगेटस् यापूर्वीच भारतीय नौदलात दाखल झाल्या असून स्टेल्थ विनाशिकांची मात्र भारतीय नौदलाला प्रतीक्षा होती. आता या वर्गातील विनाशिकाही नौदलात दाखल होण्यास सुरुवात होईल. स्टेल्थ विशेष गुणांमुळे अशा प्रकारची बांधणी असलेल्या युद्धनौका शत्रुच्या रडारला चकवा देण्यात यशस्वी ठरतात.  विशाखापट्टणम ही विनाशिका तब्बल तीन हजार टन वजनाची आहे. उद्या सुक्या गोदीतून जलावतरण झाल्यानंतर तिच्या समुद्रावरील चाचण्यांना सुरुवात होईल.
 दोन आठवड्यांपूर्वीच  स्कॉíपन पाणबुड्यांचे डीडॉकिंगही पार पडले होते.
१६३ मीटर्स लांबीच्या या विनाशिकेला चार गॅस टर्बाइन्सच्या माध्यमातून इंधनपुरवठा होणार आहे. ३० सागरी मल प्रतिसात एवढा तिचा वेग असेल. यावर सर्वात अद्ययावत अशी शस्त्रयंत्रणा बसविण्यात येईल. त्यात भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणारया स्वनातीत वेगवान क्षेपणास्त्रांचाही समावेश असेल.