मूलपेशींच्या वापराने विविध आजार बरे करण्याच्या नावाखाली सुरू झालेली दुकानदारी हद्दपार करणारी नवी मार्गदर्शक तत्त्वे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (आयसीएमआर) ने जाहीर केली आहेत. यानुसार यापुढे एखाद्या रुग्णावरील (स्टेम सेल) मूलपेशीचा वापर हा केवळ संशोधन म्हणून करता येणार असून उपचार असे त्याचे स्वरूप असणार नाही.
केंद्र सरकरच्या या नव्या मार्गदर्शक तत्त्वामुळे अलीकडच्या काळात स्टेम सेल उपचारपद्धतीच्या नावाखाली वैद्यकीय व्यवसायात निर्माण झालेल्या नव्या जातकुळीला हादरा बसला आहे. यापुढे रुग्णावरील स्टेम सेलचा वापर हा केवळ मान्यताप्राप्त केंद्रांमध्येच करता येणार असून विज्ञान आणि वैद्यकाच्या विकासासाठीच तो करता येणार आहे. रुग्णावरील उपचाराच्यानावाखाली यापुढे स्टेम सेलचा वापर करता येणार नाही, असे नव्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.
‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी’ यांच्या संयुक्त मसुदा समितीने ‘स्टेम सेल उपचार’ या शब्द वगळण्यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. या समितीच्या म्हणण्यानुसार स्टेम सेल उपचार पद्धतीची गुणवत्ता अजूनही पुरेशा प्रमाणात सिद्ध झालेली नसल्यामुळे त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित होऊ शकत नाहीत. अजूनही ही उपचारपद्धती संशोधनात्मक पातळीवर असल्यामुळेच ‘उपचार’ हा शब्द वगळण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने मार्च २०११ मध्ये वेलौर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील हिमॅटॉलॉजिस्ट डॉ. आलोक श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली देशातील स्टेम सेल संशोधनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याबरोबरच नियंत्रण व पाहणी करण्यासाठी समितीची स्थापना केली होती.
मानवी आरोग्याच्या दृष्टीने मूलपेशींचे संशोधन व उपचाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र त्याचवेळी अनेक मूलभूत संशोधन व शास्त्रीय बैठक, नैतिक आणि सामाजिक मुद्दय़ांचा विचार होणे आवश्यक होते. या समितीने र्सवकष विचार करून नवीन नियमावली तयार केली असून यातून ‘उपचारा’ला हद्दपार केले आहे. यामुळे मूलपेशींच्या संशोधनाला खऱ्या अर्थाने चालना मिळून यातील दुकानदारीला आळा बसेल असा विश्वास ज्येष्ठ डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.