प्राध्यापक आणि विद्यार्थी संघटनांची मागणी; किमान २० परीक्षांचे निकाल बाकी

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘ऑनस्क्रीन मूल्यांकन’ योजनेचा पुरता फज्जा उडून अभूतपूर्व फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला असून अजूनही किमान वीस परीक्षांचे निकाल लागावयाचे शिल्लक आहेत. हजारो विद्यार्थ्यांचे तसेच परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून न येणारे असून कुलगुरूंबरोबर आता कुलपती व राज्यपाल असलेल्या विद्यासागर राव आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचेही विसर्जन करा अशी मागणी युवासेना, बुक्टू तसेच काही विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

या ‘विनोदी’ शिक्षणमंत्र्याला अजूनपर्यंत या घोळासाठी हेल्पलाइनही सुरू करता आलेली नाही. जे निकाल लागले त्यामध्ये असलेल्या अनंत चुकांपायी विद्यार्थ्यांची जी परवड सुरूआहे त्यावर एक शब्दही शिक्षणमंत्री व कुलपती असलेले राज्यपाल बोलायला तयार नाहीत. भाजपने सत्तेत आल्यानंतर मुंबई विद्यापीठासह सर्व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये संघ परिवारातील लोकांच्या मोठय़ा प्रमाणात नियुक्ती करण्यास सुरुवात केली. त्याचाच फटका सध्या मुंबई विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. ‘भोगा आपल्या कर्माची फळे’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आता यापुढे ‘भोगा आपल्या कमळाची फळे’ असे म्हणण्याची वेळ आल्याचा टोलाही प्राध्यापक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी लगावला.

विनोद तावडे यांची तात्काळ शिक्षणमंत्री पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना निकाल वेळेवर लावून देण्यात विश्वास निर्माण करण्यात कुलपती व राज्यपाल सी. विद्यासागर राव संपूर्ण अपयशी ठरल्यामुळे त्यांचेही विसर्जन होणे गरजेचे असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. हंगामी कुलगुरू व अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करून विद्यापीठाचा कारभार चालवावा लागत आहे ही गंभीर बाब असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठ निकाल लावत असल्याचे सांगत असले तरी दर पाच मुलांमागे एका विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवल्याचा आरोप प्राध्यापक कुलकर्णी यांनी केला. विद्यापीठात आज संपूर्ण सावळा गोंधळ सुरू असून विद्यार्थ्यांना कोणतेही योग्य मार्गदर्शन केले जात नाही. परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना निकालाचा फटका बसला त्यांच्यासाठी निकालात तांत्रिक अडचण आली असून ती आम्ही दूर करू मात्र या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका, असा विशेष शासन आदेश काढून तो परदेशी विद्यापीठांना पाठवून राज्य शासनाने या विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा होता, असे ‘सिटिझन फोरम’चे प्राध्यापक वैभव नरवडे यांनी सांगितले.

आपली रजा संपल्याने आपल्याला कामावर घ्यावे असे पत्र राज्यपालांना पाठविण्याची हिंमत डॉ. संजय देशमुख करूच कशी शकतात, असा सवालही प्राध्यापक नरवडे यांनी उपस्थित केला. किमान आता विद्यार्थ्यांचे निकाल, गुणपत्रिका तसेच परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तातडीने हेल्पलाइन तरी सुरू करा, असे आवाहनही प्राध्यापक नरवडे व चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले.

राज्य शासनाने त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही राज्यपालांप्रमाणेच निकाल लावण्यासाठी विद्यापीठाला मुदत दिली होती. पाच वेळा मुदत देऊनही आजपर्यंत विद्यापीठाला सर्व निकाल जाहीर करता आलेले तर नाहीच शिवाय गुणपत्रिका सदोष दिल्यामुळे सध्या विद्यार्थी व पालकांचे जे हाल सुरू आहेत त्याची जबाबदारी आता कुलपती व राज्यपाल असलेल्या सी. विद्यासागर राव तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही घेतली पाहिजे. या दोघांचेही आता विसर्जन करायला हवे

                                    – चंद्रशेखर कुलकर्णी, सहसचिव, ‘बुक्टू’