गेल्या पाच-सहा महिन्यात सोनसाखळी चोऱ्यांची संख्या तब्बल ८० टक्क्यांनी घटली आहे. डी. एन. नगर पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी तक्त्यात ‘ती’ शून्यावर आली आहे. ही कमाल अचानक झालेली नाही. सहा महिन्यांपूर्वी डी. एन. नगर पोलिसांनी केलेल्या एका थरारक पाठलागाचा तो परिपाक आहे..

प्रत्येक दिवशी पश्चिम उपनगरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या सोनसाखळी चोऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त छेरिंग दोरजे आणि उपायुक्त सत्यनारायण चौधरी हैराण झाले होते. डी. एन. नगर, जुहू, सांताक्रूझ, वाकोला ते अगदी मीरा रोडपर्यंत होत असलेल्या सोनसाखळी चोऱ्यांमध्ये कुठला तरी एक समान धागा आहे, याची कल्पना डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनाजी नलावडे यांना आली होती. हा समान धागा हाती लागला तर सोनसाखळी चोऱ्यांना आपसूक चाप बसेल असा त्यांचा होरा होता. सहायक निरीक्षक संदीप गीते यांच्या पथकाच्या मदतीने सुरू झाला. तब्बल सहा महिन्यांनंतर त्याला यश आले आणि सोनसाखळी चोऱ्यांना चाप बसला..
डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता एका तरुणाकडे अंगुलिनिर्देश होत होता. अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरही विशिष्ट तरुणाकडेच लक्ष वेधले जात होते. परंतु त्याचा शोध घ्यायचा कसा़? डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरडावाडी येथे सोनसाखळी चोरीची घटना घडली आणि संबंधित चोराचा पाठलाग सुरू झाला. तोपर्यंत वरिष्ठ निरीक्षकही घटनास्थळी पोहोचले होते. परंतु तो थोडक्यात निसटला. तेथील विविध सोसायटय़ांच्या आवारातील भिंतीवरून उडय़ा टाकत पळालेला हा तरुणच प्रामुख्याने सर्वच सोनसाखळी चोऱ्यांमध्ये आपल्या साथीदारासह आघाडीवर असल्याचे दिसून आले. दुसऱ्या साथीदाराचाही शोध सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित तरुण लाल रंगाचे बूट घालत असल्याचे दिसून आले. आपण पकडले जाऊ नये या भीतीने अंगावरील शर्टही त्याने काढून फेकले होते. तोच खरे तर पोलिसांसाठी महत्त्वाचा दुवा ठरला.
शर्टवरील टेलरच्या पत्त्यावर तपास सुरू झाला. अशा प्रकारचे शर्ट कोण वापरायचा याची चौकशी केली असता मालवणीतील कलेक्टर कंपाऊंडमधील एक पत्ता सापडला. परंतु तेथे कोणी काहीही माहिती देत नव्हते. डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकातील रमेश जाधव, संदीप भोळे, मधुकर शिंगटे, नरेंद्र घाणेकर, मधुकर कसफ़ळे, मनोज मोरे, हेमंत पाटील, योगेश कदम आदींनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. पश्चिम उपनगरात धुडगूस घालणारा आतिफ मोबीन अन्सारी (३२) हा तरुण असल्याचे शिक्कामोर्तब झाले. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पोलिसांनी आतिफचा भाऊ आसिफला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवूनही तो काही माहिती देऊ शकला नाही. दुसरीकडे सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली होती. एका चोरीनंतर आतिफने भररस्त्यात गस्तीवर असलेल्या एका शिपायाला चोरलेली सोनसाखळी हवेत फिरवत वाकुल्या दाखविल्या. त्यामुळे पोलिसांपुढील आव्हान अधिकच वाढले.
तोपर्यंत पोलिसांनी त्याचा साथीदार युसुफ ऊर्फ इर्शाद समशेर खान (२०) याची माहिती मिळविली होती. परंतु त्याला पकडले तर आतिफ सावध होईल या हेतूने त्याच्यावर फक्त पाळत ठेवण्यात आली. युसुफसोबत तो कधीतरी दिसेल या भ्रमात पोलीस होते. परंतु तो सापडला नाहीच. तब्बल पाच-सहा महिने तो पोलिसांशी लपंडाव खेळत होता. अखेरीस मीरा रोड येथे लाल रंगाच्या स्विफ्ट मारुती कारमध्ये आतिफ असल्याची पक्की खबर मिळाली आणि पोलीस पथक तेथे पोहोचले.. मग सुरू झाला धूम स्टाईल पाठलाग. त्याची गाडी अडविण्यासाठी एक स्कूटीही आडवी टाकण्यात आली. परंतु तरीही तो मुंबई-अहमदाबाद मार्गावर १४० च्या वेगाने निघाला. त्याच्यामागोमाग वरिष्ठ निरीक्षक नलावडे, सहायक निरीक्षक गीते आणि त्यांचे पथक. पाऊस कोसळत होता. १२० च्या वेगाने मोटारसायकलवरून पाठलाग सुरू होता. एका क्षणी तो हाती येईल, असे वाटले होते. परंतु तो निसटला. पोलिसांनी गोळीबार केला..तब्बल दोन तासांचा पाठलाग व्यर्थ गेला होता.. परंतु पोलिसांनी आशा सोडली नव्हती.
इतके होऊनही आतिफ विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा सोनसाखळी चोरी करण्यासाठी आला होता. नाकाबंदीत त्याच्याकडे पोलिसांनी मोटरसायकलचे पेपर्स मागितले. पेपर्स नसल्याने त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सहायक निरीक्षक गीते यांच्या खबऱ्याने माहिती दिली अन् पथक लगेच पोलीस ठाण्यात पोहोचले. चिरीमिरी देऊन सुटण्याच्या तयारीत असलेल्या आतिफला गीते यांनी ओळखले आणि त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आपला सोनसाखळी चोऱ्यांशी काही संबंध नाही, असा तो आव आणत होता. परंतु सीसीटीव्ही फुटेजवरून काढलेले छायाचित्र मिळतेजुळते असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याने डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गुन्ह्य़ांची माहिती दिली. परंतु त्याचा साथीदार युसुफ याची स्वतंत्र चौकशी केली असता तब्बल १५ ते १७ गुन्ह्य़ांची माहिती उघड झाली. इतर पोलीस ठाण्यांनी त्याचा ताबा घेतला असता तब्बल ३५ गुन्ह्य़ांची उकल झाली.
दर महिन्याला सोनसाखळी चोरीतून तब्बल आठ ते दहा लाख रुपये आपण कमावीत होतो. सारे पैसे अय्याशीत उडविले. विमानाने फिरण्याचा त्याला शौक होता. त्याच्या मुलाला कर्करोग झाला होता. तो फक्त पत्नीशी संपर्कात असे. साथीदार युसुफलाही वेगवेगळया मोबाइल क्रमांकावरून तो फोन करीत असे. तब्बल दोन वर्षे त्याने धुम्डगूस घातला. परंतु डी. एन. नगर पोलिसांनी सतत लक्ष केंद्रित करून आतिफ आणि युसुफला ताब्यात घेतल्यामुळे आता मात्र सोनसाखळी चोऱ्यांचे गुन्हे आपसूकच ८० टक्क्यांनी कमी झाले.
निशांत सरवणकर – nishant.sarvankar@expressindia.com
twitter.@ndsarwankar