जकात रद्द करून एलबीटी आणण्यास विरोध करणाऱ्या कामगार संघटनेचे नेते शरद राव यांनी घुमजाव करत आता एलबीटीला पाठिंबा दिला आहे. व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून एलबीटी रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास ११ ते १३ डिसेंबरदरम्यान राज्यातील सर्व पालिकांचे कर्मचारी काम बंद ठेवतील व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्यास ती फोडली जातील, असा जाहीर इशारा शरद राव यांनी दिला.
महापालिकांना जकातीचे उत्पन्न मिळाले नाही तर कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणार नाहीत, असे सांगत गेल्या वर्षी राव यांनी एलबीटीला विरोध केला होता.
एलबीटीमुळे चांगले उत्पन्न जमा होत असल्याचे लक्षात आले आहे, मात्र पालिकांना अनुदान मिळवण्यासाठी सहा-सहा महिने वाट पाहावी लागते, त्यामुळे धुळे, नंदुरबार येथील पालिका कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाहीत, असे सांगतानाच शरद राव यांनी एलबीटी रद्द न करण्याची मागणी केली आहे.