बैलांना मारणे, दारू पाजणे गुन्हा; कोणालाही इजा झाल्यास आयोजक जबाबदार

शर्यतीसाठी गाडीला जुंपल्या जाणाऱ्या बैलांना कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये, गाडीचालकास कोणतीही काठी किंवा पायाने बैलास मारता येणार नाही तसेच शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलगाडीच्या सोबत कोणतेही वाहन धावणार नाही. एवढेच नव्हे तर शर्यतीमध्ये कोणतीही दुर्घटना घडल्यास किंवा बैल, गाडीचालक किंवा प्रेक्षक यांच्यापैकी कोणालाही इजा झाल्यास त्याला सर्वस्वी आयोजकानाच जबाबदार धरण्यात येणार आहे.

बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांचा होणारा छळ रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. त्यावर १९६० च्या महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा करीत राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच  बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविली आहे. मात्र नव्या कायद्याबाबतची नियमावली तयार नसल्याने ही बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. नियमावली तयार झाल्याशिवाय आणि त्यात प्राण्यांना इजा होणार नाही याची खात्री पटल्याशिवाय बैलगाडी शर्यतीस परवानगी देणार नसल्याची भूमिका उच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यानुसार राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीबाबतच्या नियमांचे प्रारूप जाहीर केले असून त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. बैलगाडी शर्यतीच्या आयोजनाबाबतचे नियम करताना प्राण्यांना कोणतीही इजा पोहोचू नये आणि लोकांनाही शर्यतींचा आनंद घेता यावा याची दक्षता घेत पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने ही नियमावली तयार केली असून त्यावर येणाऱ्या हरकती सूचनांचा विचार करून ही नियमावली अंतिम केली जाईल असे या विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

या नियमावलीनुसार बैलगाडी शर्यत आयोजित करताना तिचे अंतर एक किलोमीटरपेक्षा अधिक ठेवता येणार नाही. शर्यत आयोजित करताना आयोजकांना पंधरा दिवस अगोदर ५० हजार रुपयांच्या बँक हमीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर जिल्हाधिकारी स्पर्धेच्या ठिकाणी आयोजकांनी केलेली तयारी, अटी शर्थीचे पालन केले आहे का याचा तहसीलदार, पोलिसांकडून अहवाल घेतील आणि त्याच्या आधारे सात दिवसात परवानगी देतील. बैलगाडी शर्यत ही एक किलोमीटर असेल.

बैल किंवा वळूंना गाडीला जुंपण्यापूर्वी २० मिनिटे आराम द्यावा लागेल. तसेच केवळ एका गाडीवानास बैलगाडीवर बसण्याची परवानगी असेल. बैलगाडी चालविताना बैलास काठीने मारणे अथवा पायाने मारणे अथवा चाबूक अथवा अन्य कोणत्याही साधनांचा उपयोग करण्यास गाडीवानास बंदी घालण्यात आली आहे.