लाच घेताना कनिष्ठ आढळला तर वरिष्ठावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आता महिला अत्याचाराबाबत तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे सुतोवाच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी केले आहे. वारंवार सांगूनही असे प्रकार घडत असल्यामुळे मारिया यांनी आता कारवाईचे हत्यार उपसण्याचे ठरविले आहे. महिला अत्याचाराबाबत कुठल्याही पोलीस ठाण्याने हद्दीचा वाद निर्माण न करता तक्रार नोंदवून घेतलीच पाहिजे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.
वांद्रे येथील २१ वर्षे वयाच्या तरुणीच्या विनयभंगप्रकरणी तीन पोलीस ठाण्यांनी तक्रार नोंदविण्यात टाळाटाळ केल्याची घटना उघडकीस आली. तक्रार नोंदविण्याऐवजी पहाटेच्या वेळी मित्रासोबत काय करीत होतीस, अशा प्रकारचे प्रश्न तिला विचारण्यात आले. धारावीतील गल्लीबोळात मध्यरात्री का गेला होतात तसेच पेहराव असा का, अशी विचारणा करणाऱ्या शाहूनगर, धारावी आणि वांद्रे पोलिसांनी विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. अखेरीस हे प्रकरण आयुक्तांपर्यंत पोहोचल्यानंतरच गुन्हा दाखल झाला. या प्रकारांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे. महिला अत्याचाराबाबत घटना कुठेही घडली तरी कुठल्याही पोलीस ठाण्याने तक्रार नोंदवून घ्यावी, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही आपल्या आदेशाचे पालन होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईलच. तसेच यापुढेही अशी चूक केल्यास संबंधित पोलिसाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असे मारिया यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ होण्याचे प्रकार घडत आहेत. गुन्ह्य़ांची संख्या वाढू नये, यासाठी ही काळजी घेतली जात असली तरी प्रत्यक्षात आपण वेळोवेळी प्रत्येक बैठकीत गुन्ह्य़ांची संख्या वाढली तरी चालेल. पण तक्रारीत तथ्य असेल तर गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले आहेत. वेळोवेळी लेखी सूचना दिल्यानंतरही महिला अत्याचाराबाबत जी उदासीनता दाखविली जात आहे, त्याची आपण गंभीर दखल घेतली आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही मारिया यांनी सांगितले.

महिलांविरुद्धच्या कुठल्याही स्वरूपाच्या तक्रारी पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद न घालता नोंदविण्याचे आदेश प्रत्येक बैठकीत देण्यात येतात. लेखी सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. यापुढे अजिबात हयगय खपवून घेतली जाणार नाही.आयुक्त राकेश मारिया