गोरेगाव स्थानकातील दुर्घटना; फलाटावरील प्रवाशाला टपली मारण्याच्या नादात जीव गमावला
पश्चिम रेल्वेमार्गावर धावत्या लोकलच्या दारातून धटिंगणपणा करणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा रेल्वे खांबाला धडकून मृत्यू झाला. प्रवीण धुर्वे असे या तरुणाचे नाव आहे. गोरेगाव स्थानकातून मालाड स्थानकात जात असताना फलाटावरील एका प्रवाशाला टपली मारताना त्याचा हात निसटून रेल्वे खांबाला धडकून प्रवीण याचा मृत्यू झाल्याचे समजते.
गोरेगाव येथे राहणारा प्रवीण याने शुक्रवारी नेहमीप्रमाणे मालाडला जाण्यासाठी स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून लोकल पकडली. मालाडच्या निर्मल महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रवीणने लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लोकलने वेग धरताच प्रवीणने गोरेगाव फलाटावर चालत असणाऱ्या प्रवाशाला टपली मारण्याचा प्रयत्न केला. यात लोकलचा वेगही अधिक वाढल्याने रेल्वे गाडीच्या डब्याबाहेर झुकलेल्या प्रवीणचा हात निसटला आणि तो जवळच असलेल्या खांबावर आपटला. या जीवघेण्या धडकेत प्रवीण गंभीर जखमी झाला. रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत रेल्वे पोलिसांना विचारले असता, सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही तपास करत आहोत. प्राप्त झालेल्या चित्रफितीनुसार प्रवीण फलाटावरील प्रवाशाला टपली मारण्यासाठी दरवाजात उभा होता, असे दिसत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.