दहावीचा निकाल लागून तीन महिने झाल्यानंतर आलेल्या फेरतपासणी अहवालात सात गुण वाढल्याने ठाण्यातील तपन शिरीष सराफ हा विद्यार्थी आता मुंबई विभागातून इतर दोन मुलींसोबत अव्वल ठरला आहे.
पहिलीपासून दरवर्षी शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या ठाण्यातील श्रीरंग विद्यालयातील तपनने दहावीतही तब्बल ९६ टक्के गुण मिळवीत यशाची परंपरा कायम राखली. इतर सर्व विषयांमधील गुणांबाबत तपन समाधानी होता. मात्र गणित आणि विज्ञान याविषयातील गुणांबाबत त्याच्या मनात शंका होती. त्यामुळे त्याच्या पालकांनी या दोन विषयांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्यासाठी मंडळाकडे अर्ज केला. अखेर तीन महिन्यानंतर गणित व विज्ञान या दोन विषयांत अनुक्रमे चार आणि तीन अशी एकूण सात गुणांनी वाढून त्याला मुंबई विभागात विभागून पहिला क्रमांक मिळाला. १७ जून रोजी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तपनला ५०० पैकी ४८० (९६ टक्के) गुण मिळाले होते. गणित व विज्ञान या दोन्ही विषयात त्याला प्रत्येकी ९६ गुण होते. या दोन्ही विषयात चार-चार गुण कमी मिळणे शक्यच नाही, या मतावर तपन ठाम होता. दरम्यान आयआयटीला जाऊन वडिलांसारखेच अभियंता होण्याचे स्वप्न उरी बाळगलेल्या तपनने ठाणे पूर्व विभागाताल पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेतला. आता तीन महिन्यानंतर फेर तपासणीचा सुधारित निकाल आला असून त्यात गणितात चार गुण वाढून त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले, तर विज्ञान विषयात ९९ गुण मिळाले आहेत. परिणामी ९७. ४० टक्के गुण मिळवीत तो आता मुलुंड येथील शेरॉन इंग्लिश हायस्कूलच्या सिद्धीनीता वांडेकर व माहीमच्या कॅनोसा हायस्कूलच्या नेहा पाटीलसोबत अव्वल ठरला. शाळेच्या मुख्याध्यापिका रूपा डे यांनी फेर तपासयणीच्या या प्रक्रियेत मदत केल्याचे शिरीष सराफ यांनी सांगितले.