१५ ते २५ टक्के वाढीच्या कारणांची विद्यार्थ्यांकडून मागणी

शैक्षणिक वर्ष २०१७-१८पासून ‘आयआयटी’ मुंबईत १५ ते २५ टक्के शुल्कवाढ करण्यात आली आहे. या वाढीविरोधात संस्थेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी निदर्शने केली. संस्थेतील ही शुल्कवाढ विद्यार्थ्यांना मान्य नसून संस्थेने त्याची कारणे द्यावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

दिवसागणिक वाढत असलेल्या खर्चामुळे संस्थात्मक खर्चातही वाढ होत आहे. यामुळे सहा महिन्यांपूर्वी संस्थेने शुल्कवाढीबाबत विचार करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीच्या अहवालानुसार संस्थेत शुल्कवाढ करण्यात आली. एकूण शुल्कवाढ १५ ते २५ टक्के असली तरी नवीन रचनेत काही शीर्षकाखालील शुल्कात ३०० टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे ही वाढ नेमकी का करण्यात आली याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी संस्थेचे विद्यार्थी कल्याण विभागाचे प्राध्यापक तसेच संस्थेचे संचालक यांच्याकडे करत होते. मात्र त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद न साधल्याने विद्यार्थ्यांनी एक स्वाक्षरी मोहीम हाती घेतली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी करत तब्बल ५२० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांनी संचालकांना दिले होते.  पण यावर देखील प्रतिसाद न मिळाल्याने अखेर विद्यार्थ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला, असे आंदोलक विद्यार्थ्यांने सांगितले. शुल्कवाढ मागे घेण्याच्या संदर्भातील फलक घेऊन संकुलात दिवसभर घोषणाबाजी करण्यात आली.

संपूर्ण संकुल फिरल्यानंतर विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन सुरू केले. यादरम्यान संध्याकाळी संचालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी शुल्कवाढ मागे घेतल्यानंतरच संवाद साधण्याचा पवित्रा घेतला. यावर संचालकांनी ही शुल्कवाढ नेमकी का करण्यात आली हे सांगणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून एक खुली सभा घेऊ, असे आश्वासन दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र संचालकांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध होईपर्यंत कोणाचेही शुल्क स्वीकारू नये, ही विद्यार्थ्यांची मागणी फेटाळून लावली.

यामुळे रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी मुख्य इमारतीच्यासमोरच ठिय्या मांडून होते. प्रशासनाने केलेली शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी व शुल्कवाढीचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थी प्रतिनिधीला स्थान द्यावे, अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. दरम्यान, शुल्कवाढीची प्रक्रिया सहा महिन्यांपासून सुरू असून तो निर्णय शुल्कवाढीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अभ्यासावरूनच घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या या समितीपुढे मांडल्या जातील यानंतरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

अशी झाली शुल्कवाढ

आयआयटीची शुल्कवाढ करताना खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शुल्कात १३.७ टक्के तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शुल्कात २४.४ टक्के वाढ करण्यात आली आहे. सर्वाधिक वाढ ही वसतिगृहाच्या भाडय़ात करण्यात आली असून ते प्रत्येक सत्राला ५०० रुपयांवरून दोन हजार रुपये इतके करण्यात आले आहे. तर परीक्षा शुल्कात ५०० रुपये, नोंदणी शुल्कात ५०० रुपये, जिमखाना शुल्कात १२५० रुपये, वीज व पाणी शुल्कात ५०० रुपये, वैद्यकीय शुल्कात १००० रुपये, वसतिगृह आस्थापना शुल्कात १००० रुपये, तर विद्यार्थी कल्याण निधीत ३०० रुपये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ करत असताना शिकवणी शुल्कात २५०० रुपयांनी कपात केली आहे. तर वसतिगृह अनुदान शुल्क पूर्णपणे वगळण्यात आले आहे. मात्र याचबरोबर खानावळ आस्थापना खर्च १५०० रुपये आणि विद्यार्थी अपघात विमा २०० रुपये हे दोन नवीन प्रकारचे शुल्क आकारण्यात आले आहे. या वाढीनंतर खुल्या प्रवर्गातील शुल्क एकूण ४७५० रुपयांनी, तर आरक्षित प्रवर्गातील शुल्क एकूण ७२५० रुपयांनी वाढले आहे.