मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे न मिळाल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पदवी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.

विद्यार्थ्यांचा नोंदणी क्रमांक उपलब्ध न झाल्याने प्रवेशपत्रे तयार करता आली नाही, असा खुलासा करत विद्यापीठाने केला. यासाठी   महाविद्यालयांचे ढिसाळ कामगिरी  जबाबदार असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहेत, परंतु अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे अद्याप तयार झालेली नाही. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांचे नोंदणी क्रमांक आम्हाला प्राप्त झाले त्यांची प्रवेशपत्रे आम्ही तयार केली आहेत, असे सांगत परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी या प्रकरणाचे खापर महाविद्यालयांवर फोडले.

ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी आमच्याकडे नोंदणी क्रमांक प्राप्त झाले अशा विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे तयार झाली नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. मात्र आम्ही महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची माहिती वेळीच पुरविली होती, परंतु विद्यापीठानेच प्रवेशपत्रे तयार करण्यास वेळ घेतला, असा आरोप एका प्राचार्यानी नाव न छापण्याच्या अटीवर केला.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळालेली नाहीत त्यांना परीक्षा महाविद्यालयातीलच परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची मुभा दिली जावी, अशी मागणी प्राचार्यानी केली आहे.

 

परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असून मंगळवारी परीक्षा सुरू होण्यापूर्वी त्यांना प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जातील.

-दीपक वसावे, परीक्षा नियंत्रक