राज्यात १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बाल स्वच्छता अभियानामध्ये विद्यार्थी स्वच्छता दूत होतील आणि सर्वत्र स्वच्छतेचा संदेश पोहोचवतील, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘स्वच्छ भारत मोहिमे’अंतर्गत राज्यात १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान शाळांमध्ये ‘बाल स्वच्छता अभियान’ राबविले जाणार आहे.
राज्यातील स्वच्छता अभियानाबाबत माहिती घेण्यासाठी तावडे यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला. या वेळी त्यांनी या मोहिमेनंतर विद्यार्थी स्वच्छता दूत बनतील आणि स्वच्छतेचा संदेश पसरवतील, असा विश्वास व्यक्त केला. या चर्चेत राज्यातील आदिवासी पाडय़ांमधील विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार आणि तेथील स्वच्छता याची माहितीही त्यांनी घेतली. तसेच राज्यातील शाळांमधील शौचालयांची माहिती घेत ज्या ठिकाणी पुरेशी शौचालये नाहीत तेथे मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधून तेथे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही केल्या आहेत. या बाल स्वच्छता मोहिमेत स्वच्छ पाणी, स्वच्छ शाळा, स्वच्छ परिसर, स्वच्छ शौचाालये आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच राज्यातील स्वच्छतागृहे उपलब्ध नसलेल्या शाळांमध्ये फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.