मध्य रेल्वेमार्गावर सातत्याने कोलमडणारे वेळापत्रक, रेल्वेचे प्रलंबित प्रकल्प, देखभाल-दुरुस्तीसाठी ठरावीक मुदत आदी मुद्दय़ांसाठी मुंबईत आलेल्या रेल्वे बोर्ड सदस्य (वाहतूक) देवीप्रसाद पांडे यांनी रेल्वे दरवाढीचे संकेत दिले आहेत. प्रवाशांना फक्त रेल्वेकडून सेवासुविधा अपेक्षित आहेत. उपनगरीय रेल्वेसेवा तोटय़ात आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे सेवासुविधांसाठी वाढीव तिकीट दर स्वीकारायला हवेत, अशा शब्दांत त्यांनी दरवाढीचे समर्थन केले. मात्र ही दरवाढ किती असावी, याबाबत प्रवाशांकडूनही मते मागवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत जून महिन्यात झालेली दरवाढ सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मागे घेण्यास भाग पाडली होती. त्या वेळी फक्त मासिक पासांच्या आणि लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या दरात १४.२ टक्के वाढ केली होती. तरीही उपनगरीय रेल्वेसेवेला तोटा सहन करावा लागत आहे.
याबाबत रेल्वे बोर्ड सदस्य (वाहतूक) देवीप्रसाद पांडे यांना विचारले असता त्यांनी दरवाढ करण्याबाबत रेल्वेबोर्डात विचार चालू असल्याचे सांगितले. ही दरवाढ फक्त मुंबईतच नाही, तर देशभरात होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.