नवी मुंबई महापौरपदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा ‘चमत्कार’ न घडता आवाजी मतदानाने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर सोनावणे हे बारावे महापौर म्हणून विजयी झाले. सोनावणे हे पहिले दलित समाजातील महापौर आहेत. उपमहापौरपदी काँग्रेसचे अविनाश लाड यांची निवड झाली. सोनावणे हे अनुसूचित जातीच्या राखीव प्रभागातून निवडून न आल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी ही शिवसेनेचे उमेदवार संजू वाडे यांनी केलेली मागणी पीठासीन अधिकारी सुमंत भांगे यांनी फेटाळल्याने ही निवडणूक नंतर सुरळीत पार पडली.
राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप युतीमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येथील नेते माजी मंत्री गणेश नाईक यांनी पाच अपक्ष व काँग्रेसबरोबर आघाडी करून पक्षाचा महापौर होईल याची काळजी घेतली. नवी मुंबईचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याचे जाहीर झाल्यावर दीड वर्षांपूर्वीच नाईक यांनी सोनावणे यांना महापौर करण्याचा शब्द दिला होता.
स्वत:च्या पक्षात पाच उमेदवार असताना अपक्ष नगरसेवकाला राष्ट्रवादीत घेऊन महापौर करण्याचा चमत्कार नाईक यांनी केला.  रबाळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी वसाहतीत राहणारे आबालवृद्धांचे ‘मामा’ नवी मुंबईचे महापौर झाले असून त्यांच्यामुळे झोपडपट्टी भागाला पहिल्यांदाच महापौरपद मिळाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्याने काँग्रेसचे लाड यांनी भाजपच्या उज्ज्वला झंझाड यांचा पराभव करून उपमहापौर झाले. महापौर आणि उपमहापौरांना निवडणुकीत राष्ट्रवादी (५२) काँग्रेस (१०), अपक्ष (५) अशी अपेक्षेप्रमाणे ६७ मते मिळाली.  सभागृहनेतेपदी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार व विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे विजय चौगुले यांची निवड झाली. पाच स्वीकृत सदस्यांसाठी दहा उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवड पुढे ढकलण्यात आली. याशिवाय १६ स्थायी समिती सदस्यांचीही नावे यावेळी जाहीर करण्यात आली.

‘करवाढ नाही’
नवी मुंबईत गेली १५ वर्षे मालमत्ता करात वाढ झालेली नाही. ती यापुढेदेखील केली जाणार नाही. आरोग्य व शिक्षण सेवेवर अधिक लक्ष देताना प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणार असल्याची ग्वाही महापौर सुधाकर सोनावणे यांनी पत्रकरांशी बोलताना दिली.

Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
अजितदादांच्या चिरंजीवाने निवडणूक लढविलेल्या मावळातून ‘घड्याळ’ हद्दपार !
Former Congress president Rahul Gandhi filed his candidature from Wayanad in Kerala
वायनाडमध्ये शक्तिप्रदर्शनासह राहुल गांधी यांचा अर्ज; अमेठीमधून उमेदवारीबाबत मौन
Sanjay Nirupam
ठाकरे गटाच्या उमेदवार यादीमुळे संजय निरुपम बंडखोरीच्या पवित्र्यात? काँग्रेसला इशारा देत म्हणाले…