सुधीर मुनगंटीवार उद्धव ठाकरे यांना भेटणार

अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी भेट घेणार असून त्यांना १ जुलै रोजी होणाऱ्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी आमंत्रित करणार आहेत. शिवसेना-भाजप यांचे संबंध ताणले गेल्याच्या पाश्र्वभूमीवर मुनगंटीवार हे ठाकरे यांना भेट घेऊन आमंत्रण देणार असून त्यांच्यात तणाव निवळण्याच्या दृष्टीने राजकीय चर्चाही होणार आहे. पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचा अपमान करूनही भाजपकडून तडजोडीचा प्रस्ताव शिवसेनेला दिला जाण्याची शक्यता आहे.

मुनगंटीवार हे ठाकरे यांच्या भेटीसाठी गुरुवारी दुपारी बारा वाजता ‘मातोश्री’ निवासस्थानी जाणार आहेत. त्यांना फायबरची वाघाची प्रतिकृती भेट देणार असून १ जुलैच्या कार्यक्रमाचे आमंत्रणही देणार आहेत. भाजपकडून शिवसेनेविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असताना आणि ठाकरे यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमावर मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी बहिष्कार टाकला असताना ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाणार आहे. त्यामुळे ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या कितीही वल्गना केल्या, तरी अपमान गिळून राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी भाजपकडून तडजोडीचीच भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. मुनगंटीवार यांची ठाकरे भेट मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच होत असल्याचे समजते.