रेल्वे अर्थसंकल्पात कोकणाच्या वाटय़ाला काहीच येत नसल्याची तक्रार कोकणात जाणारा चाकरमानी सातत्याने करत असतो. मात्र आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणच्या विकासासाठी रेल्वे समर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. कोकणच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेला काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. यात दुपदरीकरणासाठी ठोस योजना, स्थानकांचा विकास आणि प्रवाशांच्या सुविधा यांचा समावेश आहे. कोकण रेल्वे वगळता वातानुकुलित डबलडेकर गाडी नियमित चालवणे, खास कोकणात जाणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढवणे आदींबाबतही प्रभू यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
कोकणात जाणारा रेल्वेमार्ग एकपदरी असल्याने या मार्गावरील वाहतुकीत अनेकदा अडथळे येतात. तसेच या मार्गावर जास्त गाडय़ा चालवणेही शक्य होत नाही. त्यासाठी या मार्गाच्या दुपदरीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मध्य रेल्वेने रोह्यापर्यंतच्या आपल्या हद्दीतील दुपदरीकरणाचे काम जोमात सुरू केले आहे. मात्र कोकण रेल्वेच्या हद्दीतील हे काम सर्वेक्षणाच्या पातळीवरच आहे. याबाबत प्रभू यांना विचारले असता, आपण कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी त्यासंदर्भात चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.