नियम डावलून माहीम येथील इमारतीला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलेले उपप्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यावर यापूर्वीही शिस्तभंगाची कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
परिमंडळ एकचे अधिकारी दोन दिवस रजेवर असताना त्यांचे कामकाज पाहताना रानडे रोड, माहीम येथील एका इमारतीला नाकारलेले ना हरकत प्रमाणपत्र तातडीने मंजूर केल्याचा आरोप काळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अग्निसुरक्षेसाठी दोन इमारतींमध्ये किमान सहा मीटरची जागा असणे अपेक्षित असल्याचा नियम डावलला गेल्याने परिमंडळ एकच्या उपप्रमुख अग्निशमन अधिकाऱ्याने इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र नाकारले होते. मात्र दोन दिवसांच्या तात्पुरत्या पदभाराच्या कामकाजात कनिष्ठ अधिकाऱ्याला न विचारता तातडीने नवा अर्ज मागवून तो काळे यांनी मंजूर केला. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत काळे दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई झाली.
एप्रिलमध्ये वाळकेश्वर येथील दाणी सदन या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय उपप्रमुख अग्निशमन अधिकाऱ्याने घेतला होता. मात्र संबंधित फाइल प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्याच्या केबिनमधून बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात काळे यांचे नाव घेतले गेले होते. बदलीचा आदेश आल्यावर काळे यांनी आकांडतांडव केल्याप्रकरणीही त्यांना दोषी ठरविण्यात आले होते.