भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असतानाच रायगड जिल्ह्यात दोन संशयास्पद बोट आढळल्याची माहिती समोर आली आहे. रायगडजवळील सागरी हद्दीत पश्चिम दिशेला दोन संशयास्पद बोटी आढळल्या असून बोटीतील लोक मुंबईकडे जाणारा रस्ता विचारत होती अशी माहिती मच्छिमारांनी सुरक्षा यंत्रणांना दिली आहे.

रायगडजवळ शुकवारी दुपारी स्थानिक मच्छिमारांना हिरव्या आणि गुलाबी रंगाची बोट दिसली. या बोटीतील लोकांनी मच्छिमारांना मुंबईकडे जाणारा मार्ग कोणता असे विचारले. बोट आणि बोटीतील लोक स्थानिक दिसत नसल्याने मच्छिमारांना संशय आला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि कोस्टगार्डच्या पथकांनी शोधमोहीम राबवली. मात्र अद्याप कोणतीही संशयास्पद बोट आढळली नसल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले. दरम्यान, संशयास्पद बोट आढळल्यानंतर मुंबई किनारपट्टीवरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस आणि कोस्टगार्डची गस्त वाढवण्यात आल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी रायगडजवळच एक संशयास्पद बोट आढळली होती. पोलिसांनी पाठलाग केला असता या बोटीतील लोकांनी पळ काढला होता. यानंतर उरणमध्येही सशस्त्र संशयित तरुण दिसल्याचे वृत्त आल्याने बोटीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पोलिस तपासाअंती ती बोट डिझेल चोरांची होती असे समोर आले होते.