शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आत्मक्लेष यात्रेवर निघालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना सलाईन लावण्यात आले. सुमारे एक तासाच्या विश्रांतीनंतर राजू शेट्टींनी पुन्हा आपल्या यात्रेस सुरूवात केली व कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळेत आपण यात्रा पूर्ण करणार असून राज्यपालांना भेटून राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी भरून दिलेले कर्जमुक्तीचे अर्ज त्यांना देणार असल्याचा निश्चय त्यांनी बोलून दाखवला. या वेळी त्यांच्याबरोबर आमदार कपिल पाटील उपस्थित होते.

रविवारी दुपारच्या सुमारास राजू शेट्टी यांची आत्मक्लेष यात्रा पनवेलहून वाशी येथे आली. वाशी येथील टोल नाका पार केल्यानंतर पोलीस चौकीजवळ आल्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढला व अस्वस्थ वाटू लागले. त्यांना लगेचच सलाईन लावण्यात आले. सुमारे एक तास विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा यात्रेला सुरूवात केली.

सदाभाऊ खोत हे सत्तेत असल्यामुळे व त्यांची तब्येत बरी नसल्याने ते आपल्या स्वागतास आले नसल्याचा टोला त्यांनी या वेळी लगावला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हेच आपले एकमेव लक्ष्य असल्याचे त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, आत्मक्लेष यात्रा वाशी खाडी पुलावर आल्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती. पनवेलहून वाशीला येणाऱ्या वाहनांना या कोंडीचा सामना करावा लागला.

ही यात्रा पुण्याहून निघाली आहे. नियोजनाप्रमाणे मंगळवारी खासदार शेट्टी हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यांच्या पायाला जखमा झाल्याने त्यांना नीट चालताही येत नाही. ते आधार घेऊन चालत जात आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत आपण यात्रा पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.