स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेच्या मुंबईतील प्रवासाला सोमवारपासून सुरूवात झाली. मात्र, या यात्रेदरम्यान राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याला भोवळ आल्याचा प्रकार घडला. गेल्या आठ दिवसांपासून सौरभ आपल्या वडिलांबरोबर पायी चालतो आहे. आज आत्मक्लेश यात्रा फाईव्ह गार्डनच्या परिसरात असताना सौरभला अचानकपणे भोवळ आली. यावेळी डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार केले. सलाईन लावल्यानंतर सौरभची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. उष्णता आणि अशक्तपणामुळे सौरभला चक्कर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतरही राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

आत्मक्लेष यात्रेदरम्यान खासदार राजू शेट्टींची प्रकृती बिघडली

आत्मक्लेश यात्रेच्या मुंबईतील प्रवासाला आजपासून सुरूवात झाली. ही यात्रा सकाळी चेंबूरहून दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाली. या यात्रेमुळे पनवेल-सायन मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यापूर्वी आत्मक्लेश यात्रा सुरू असताना वाशी येथे राजू शेट्टी यांना रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना सलाईन लावावे लागले होते. सुमारे एक तासाच्या विश्रांतीनंतर राजू शेट्टींनी पुन्हा आपल्या यात्रेस सुरूवात केली व कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळेत आपण यात्रा पूर्ण करणार असून राज्यपालांना भेटून राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी भरून दिलेले कर्जमुक्तीचे अर्ज त्यांना देणार असल्याचा निश्चय त्यांनी बोलून दाखवला होता.
विरोधात असताना आम्हीदेखील कर्जमाफीची मागणी करायचो: गडकरी