राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला. मात्र गेले अडीच-तीन वर्षे सेवा ज्येष्ठतेच्या निकषावर बोट ठेवणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अमिताभ राजन यांची सेवाजेष्ठता नाकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चव्हाण यांच्या या निर्णयावर राजन यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
 सुब्रमण्यम यांचा अपवाद वगळता राज्यात आजवर सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य सचिवांची नियुक्ती केली जात असे. मुख्यमंत्री चव्हाण यांनीही सर्व वरिष्ठ सनदी अधिकारी तसेच पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या सेवा ज्येष्ठतेनुसारच करण्याचे धोरण अवलंबिले होते. त्यानुसार १९७९च्या तुकडीतील ज्येष्ठ सनदी अधिकारी अमिताभ राजन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती होण्याची अटकळ बांधली जात होती. मात्र चव्हाण यांनी हा निकष बाजूला ठेवत १९८०च्या तुकडीतील सर्वात ज्येष्ठ सनदी अधिकारी स्वाधीन क्षत्रिय यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली.
राजन यांच्या कार्यप्रणालीबद्धल मोठय़ाप्रमाणात नाराजी होती. त्यातच विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीसाठी आमदार, मंत्र्यांचीही क्षत्रिय यांनाच पसंती होती. त्यामुळेच क्षत्रिय यांनी बाजी मारल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्य़ाद्रीवर गेलेल्या राजन यांना क्षत्रिय यांच्या नियुक्तीची कल्पना मिळताच त्यांनी आपली नाराजी व्यक्त करीत घरचा मार्ग धरल्याचे समजते.
दरम्यान, गेल्या ३६ वर्षांच्या सनदी सेवेत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिले. मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आणि अन्य सचिवांच्या मंत्रालयातील फेऱ्या कमी करून त्यांना त्यांच्या विभागात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आणि प्रशासनची घडी बसविण्याचा प्रयत्न केला, असे मावळते मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांनी सांगितले.

लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनावर आपला भर असेल आणि हीच माझ्या कामाची त्रिसूत्री असेल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ऑनलाइनच्या माध्यमातून किमान १० सुविधा लोकांना देण्यावर माझा भर असेल.
स्वाधीन क्षत्रिय