बाळासाहेबांच्या निधानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे अत्यंत उत्तमप्रकारे सांभाळली असून, हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी शिवसेना आणि भाजपने एकत्र आले पाहिजे, असे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सांगितले. त्यांनी शनिवारी सकाळी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सध्या भाजपकडून शिवसेनेला सत्तेत सहभागी घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून, याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दोन्ही पक्षांतील मध्यस्थीसाठी उद्धव यांची भेट घेतली. शिवसेना अतिशय महत्वाच्या खात्यांवर अडून बसल्यामुळे युतीच्या चर्चेचे घोडे अडकून पडले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी थेट केंद्रातून सुब्रह्मण्यम स्वामी यांना पाचारण करण्यात आले असून, यासंदर्भात ते अमित शाह आणि नितीन गडकरींचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, उद्धव आणि स्वामी यांच्यातील सुमारे अर्ध्या तासाच्या या बैठकीतील चर्चेचा तपशील गुप्त ठेवण्यात आला आहे.