खासगी प्रयोगशाळेतून स्वाइन फ्लू संसर्गाचे अहवाल जास्त प्रमाणात येत असतील तर उपचार सुरू करण्यासोबतच रुग्णांची शासकीय प्रयोगशाळेत पुनश्च तपासणी केली जाणार आहे. सरकारी प्रयोगशाळांपेक्षा खासगी प्रयोगशाळांमधील एचवन-एनवन संसर्ग दाखवणारे अहवाल २५ ते ३० टक्के जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे रुग्णाचा स्वाइन फ्लूमुळेच मृत्यू झाला आहे का, याची खातरजमा करण्यासाठी काटेकोर मृत्यू परीक्षण अहवालही आरोग्य यंत्रणा तयार करणार आहेत.
आतापर्यंत राज्यात ६,८०९ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले असून ६२३ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यातील १,२४५ रुग्ण ऑगस्टमधील असून मृतांची संख्या ६५ आहे. या काळात तब्बल ६२ हजार ८९६ संशयित स्वाइन फ्लू रुग्णांना ओसेल्टामिव्हिर औषध देण्यात आले आहे. राज्य शासनाकडून आलेल्या ओसेल्टामिव्हिरच्या २९ हजार गोळ्यांपैकी सुमारे १५,५०० गोळ्या पालिकेकडून रुग्णांना देण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लूचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन पालिकेने स्वत:ही औषधखरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर कस्तुरबा रुग्णालयात रविवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत स्वाइन फ्लूच्या चाचण्या तसेच मृत्यू अहवाल अधिक काटेकोरपणे करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिल्या. मुंबईत कस्तुरबा आणि हाफकिन या सरकारी प्रयोगशाळांसोबतच मेट्रोपोलिस, एसआरएल या खासगी प्रयोगशाळांमधून एचवनएनवन चाचणी करण्यास मान्यता आहे. त्याचसोबत पुण्यातील एनआयव्हीसोबत भिडे प्रयोगशाळा तसेच नागपूर येथील लाल प्रयोगशाळेतही या चाचण्या केल्या जातात. या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत सुमारे साडेचार ते पाच हजार रुपये आकारले जातात. खासगी प्रयोगशाळेत तपासणीअंती एचवनएनवनचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येचे प्रमाण सरकारी प्रयोगशाळांच्या तुलनेत २५ ते ३० टक्के अधिक आहे, या अहवालांच्या सत्यासत्यतेची पडताळणी करण्यासाठी या प्रयोगशाळांमधी अहवालांची पुनपडताळणी केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ, दीपक सावंत यांनी दिली. असे आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.
स्वाइन फ्लू आणि स्वाइन फ्लू सदृश्य लक्षणांमुळे झालेले मृत्यू यातील फरक निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीची बैठक मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी होणार आहे. स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या पन्नास टक्क्य़ांहून अधिक रुग्णांमध्ये इतर आजारही होते. त्यामुळे स्वाइन फ्लूनेच नेमका मृत्यू झाला का हे काटेकोरपणे तपासण्याची गरज आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करून प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देण्यावरही कडक निर्बंध घातले जातील. त्याचप्रमाणे शासनाची मान्यता नसतानाही एचवनएनवनच्या चाचण्या करत असलेल्या सेव्हन हिल्ससारख्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.