मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे. मात्र स्वाइन फ्लूसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मुंबईकरांच्या छातीत धडकी भरली सून पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, थंड हवामानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 नागपूर, पुण्यापाठोपाठ मुंबईतही स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. त्यामुळे स्वाइन फ्लूची साथ आटोक्यात येऊ लागली होती. मुंबईमध्ये शनिवारी दुपारनंतर पडलेल्या रिमझिम पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र थंड हवामानात स्वाइन फ्लूच्या साथीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असल्याने मुंबईकरांना धडकी भरली आहे.
 गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लूची साथ नियंत्रणात आली आहे. मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून स्वाइन फ्लूसाठी पोषक आहे. त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव वाढू शकतो किंवा साथ नियंत्रणात थोडा वेळ लागू शकेल. सर्दी-पडसे झालेल्या काही नागरिकांनी विनाकारण स्वाइन फ्लूशी संबंधित चाचण्या करून घेतल्या होत्या. मात्र चाचण्यांचा आहवाल मिळेपर्यंत त्यांची प्रकृती सुधारली होती. स्वाइन फ्लूची लक्षणे वाटू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन साथ रोग नियंत्रण कक्षाच्या डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

दोन महिलांचा मृत्यू
अंधेरी येथील कोकीळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या स्वाइन फ्लूग्रस्त दोन महिलांचा शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूला बळी पडलेल्या मुंबईतील नागरिकांची संख्या तीनवर पोहोचली आहे. मात्र आसपासच्या शहरांतील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालया दाखल झालेल्या १७ जणाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची एकूण संख्या २० वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये शनिवारी ४० जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मुंबईतील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ५२५ वर, तर मुंबईत उपचारासाठी आलेल्या इतर शहरांतील स्वाईन फ्लूग्रस्त रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. त्यापैकी ५० वर्षीय महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर अंधेरीतील दुसऱ्या ६८ वर्षीय महिलेचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला.