जुलै महिन्यात ८८३ रुग्णांची नोंद; स्वाइन फ्लूचे ५३८ रुग्ण; लेप्टोमुळे तिघांचा बळी

दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या अतिसार (गॅस्ट्रो) या आजाराचा फैलाव वाढला असून केवळ जुलै महिन्यात ८८३ गॅस्ट्रोच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूने राज्यभरात धुमाकूळ घातला असून आता अतिसार या आजाराने मुंबईत डोके वर काढावयास सुरुवात केली आहे.

१ ते २६ जुलै या कालावधीत स्वाइन फ्लूच्या ५३८ रुग्णांची नोंद करण्यात आली असून यातील १६० रुग्ण हे मुंबईबाहेरील आहेत. या महिन्यात ५ रुग्णांचा तर जानेवारी ते जुलै या महिन्यात १६ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. उघडय़ावरील अन्नपदार्थ व दूषित पाण्यातून अतिसाराची लागण होते.

जुलै महिन्यातच ७७३ अतिसाराच्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे येत्या दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त इतर साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

जनावरांचे मलमूत्र मिसळलेल्या पाण्याच्या संपर्कात आल्याने लेप्टो या आजाराची लागण होते. पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात प्राण्यांचे मलमूत्र मिसळलेले असते व यात पायाला जखम झाली असेल तर लेप्टोचे जंतू या जखमेतून शरीरात प्रवेश करतात व लेप्टोची लागण होते. या आजारापासून बचाव करण्यासाठी गेल्या वर्षीही पालिकेने तबेल्यांना नोटीस पाठविल्या होत्या व तबेल्यातील मलमूत्राचे योग्य प्रकारे विल्हेवाट करण्याचे आदेशही दिले होते. स्वाईन फ्लू, मलेरिया हे आजारही वेगाने पसरत असल्याने दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते.

  • पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार इतर आजारांच्या तुलनेत लेप्टोच्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होत नसली तरी जुलै महिन्यातच तिघांचा लेप्टोची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
  • तीव्र ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटय़ा, श्वसनाचा त्रास होणे ही लेप्टोची लक्षणे आहेत. लेप्टोमुळे मुंबईतील जीटीबी नगर येथील ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून कांजूरमार्ग येथील ३२ वर्षीय पुरुष व माटुंग्यातील ३० वर्षीय तरुणाचाही लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे.

घ्यावयाची काळजी

  • रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार घ्या.
  • पाणी उकळून प्या.
  • घरात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या.

रुग्णसंख्या (१ ते २६ जुलै २०१७)

  • डेंग्यू – ५२
  • लेप्टो – ४९ (३ मृत्यू)
  • मलेरिया – ५४१
  • अतिसार – ८८३
  • हेपेटायटिस – १२८
  • स्वाइन फ्लू – ५३८ (१६० मुंबईबाहेरील)
  • कॉलरा – १