राज्यात १०५८ रुग्णांची नोंद; २१० मृत्यू

एक महिन्यापूर्वी अलाहाबादहून आलेल्या ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी दीड वर्षांचा मुलगा आणि ७३ वर्षांची महिला अनुक्रमे २८ एप्रिल व १२ मे रोजी स्वाइन फ्लूमुळे दगावले होते. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत १६ मे, रविवारी शीव रुग्णालयात ३० वर्षांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यात या आजाराच्या १०५८ रूग्णांची नोंद झाली आहे.

अलाहाबाद येथून आलेली ही महिला भांडुप येथे गेल्या महिनाभरापासून राहत होती. ही महिला सात महिन्यांची गर्भवती होती. तिला दम्याचा त्रासही होता. चार-पाच दिवसांपूर्वी तिला ताप येणे, छातीत कफ जमा होणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलटय़ा असा त्रास होत होता. ही लक्षणे दिसताच तिला भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात नेण्यात आले. मात्र रुग्णालयाने या महिलेला शीव रुग्णालयात नेण्यास सांगितले. १३ मे रोजी सायंकाळी ७.२० मिनिटांनी तिला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी रुग्णाचे रक्त कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र रविवारी, १६ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला दम्याचा त्रास होता. त्यातच एच१एन१ या विषाणूची लागण झाल्यामुळे तिच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले. शिवाय ही महिला ७ महिन्याची गर्भवती असल्याने एच१एन१ची बाधा लवकर झाली. गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना साथीच्या आजारांची लागण लवकर होते. यासाठी पालिकेने अधिक दक्षता बाळगणे आवश्यक आहे.

याशिवाय गर्भवती महिलांनी साधा ताप, सर्दी, खोकला असे आजारही अंगावर काढू नये आणि तात्काळ रक्ताची तपासणी करून घ्यावी, असे स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी सांगितले.  आतापर्यंत पालिकेकडून २०२६ नागरिकांची स्वाइन फ्लू आजारावर तपासणी करण्यात आली असून यामध्ये ५२५ घरांचा समावेश आहे. भांडुपमध्ये स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्यानंतर केलेल्या सर्वेक्षणात ३ एच१एन१ विषाणूचे रुग्ण आढळले. हे रुग्ण आढळलेल्या परिसरावर लक्ष ठेवण्यात आले आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

१ लाख एच१एन१ लसींची मागणी

  • राज्यात १०५८ स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंदणी झाली असून त्यातील २१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ८ रुग्ण हे सध्या वेंटिलेटरवर असून आतापर्यंत २७,७५४ नागरिकांना स्वाइन फ्लूची लस देण्यात आली आहे.
  • एक महिन्यापूर्वी राज्याच्या आरोग्य संचालनालयाकडून स्वाइन फ्लूच्या १ लाख ‘आयव्ही’ या लसींची मागणी करण्यात आली आहे.
  • त्यातील २५ हजार लसी येत्या जूनपर्यंत उपलब्ध असतील. त्यानंतर आवश्यकतेनुसार उरलेल्या लसी मागविण्यात येईल, असे राज्याच्या आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.