स्वाइन फ्लूमुळे एकीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना पर्यटनाच्या क्षेत्रातील मोठा तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. राजस्थान व महाराष्ट्रातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने विमानवाहतूक व पर्यटनक्षेत्रात तब्बल साडेपाच हजार कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचा दावा अ‍ॅसोचॅमने (द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया) केला आहे.
सध्या राजस्थान, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा येथे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. या साथीच्या भीतीने पर्यटकांची संख्या आधीच कमी झाल्याची ओरड सुरू झाली आहे.  दर महिन्याला दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे आठ लाख प्रवासी उतरतात. मुंबईसह महाराष्ट्रातील पर्यटनाचा मोसमही याच काळात असतो. राजस्थान आणि महाराष्ट्रात स्वाइन फ्लूची साथ आल्याने पर्यटन तसेच विमानवाहतुकीच्या क्षेत्रात साडेपाच हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता अ‍ॅसोचॅमने केली आहे.