लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती माझा सहकारी तहावुर राणा आणि शिकागोमधील इमिग्रेशनचे काम करणारा पाकिस्तानी नागरिक या दोघांनाही होती, अशी माहिती पाकिस्तानी-अमेरिकी दहशतवादी डेव्हिड हेडली याने बुधवारी दिली. या खटल्यातील सहआरोपी अबू जुंदाल याच्या वकिलांकडून हेडलीची उलटतपासणी सध्या घेण्यात येते आहे. त्यावेळी त्याने ही माहिती दिली.
तो म्हणाला, २६/११ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या सुमारे चार महिने अगोदर आपण लष्कर ए तोयबासाठी हेरगिरी करीत असल्याची माहिती राणाला दिली होती. आपण लष्कर ए तोयबासाठी काम करत असून, त्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही केले असल्याचे मीच राणाला सांगितले होते, असे हेडलीने म्हटले आहे. मी लष्करे ए तोयबाशी संबंधित असल्याचे समजल्यावर सुरुवातीला राणाने आपल्याला विरोध केला होता. त्याचबरोबर मुंबईतील कार्यालय वापरू नकोस, असेही त्याने आपल्याला बजावले होते. पण नंतर मी त्याची मनधरणी केली. ही सगळी गोष्ट जुलै २००८ मध्ये घडली होती, असेही हेडलीने आपल्या कबुलीमध्ये सांगितले.
सध्या अमेरिकेतील कारागृहात ३५ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या हेडलीला २६/११च्या खटल्यात आरोपी बनवण्यात आल्यावर त्याने माफीचा साक्षीदार करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. तसेच हल्ल्याचा कट कसा, कुठे आणि कुणी शिजवला याची माहिती देण्यास सरकारी पक्षाला आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर अबू जुंदालचे वकील वहाब खान यांनी हेडलीच्या उलटतपासणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.