राज्य सरकारतर्फे येत्या १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून या मोहिमेत सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी वृक्ष लागवडीचा सेल्फी दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुपारी एक वाजेपर्यंत कामावर अनुपस्थित राहण्याचीही मुभा देण्यात आली आहे.

कृषी दिवस आणि वन महोत्सवाचे औचित्य साधून सरकारतर्फे येत्या १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यामध्ये सामाजिक वनीकरण व वनविकास महामंडळातर्फे दीड कोटी तर सरकारच्या अन्य विभागांमार्फत ५० लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्ष लागवड मोहिमेत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे. स्वत: वृक्षारोपण करण्याबरोबरच स्वयंसेवक म्हणून यो मोहिमेत सहभागी होणे, लोकांना वृक्षारोपणासाठी उद्युक्त करणे, या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणे आदी कामांमध्ये कर्मचाऱ्यांनी सहभागी होणे अपेक्षित असून त्यासाठी या कर्मचाऱ्यांना दुपारी एक वाजेपर्यंत कार्यालयात विलंबाने येण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र वृक्षारोपणाचा सेल्फी दाखविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच ही सवलत मिळेल, असे सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना यांनी सांगितले.