छापीलपेक्षा अधिक किंमत आकारणी; १६ खटले दाखल

छापील किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणाऱ्या राज्यातील विमानतळांवरील दुकानांकडे वजन-मापे विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथील विमानतळांवरील दुकानांवर कारवाई करून तब्बल १६ खटले दाखल केले आहेत. पहिल्यांदाच अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे.

विमानतळावर ग्राहकांची लूट होत असल्याच्या असंख्य तक्रारी वैधमापन विभागाचे संचालक व पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्याकडे आल्या होत्या.

त्यानुसार त्यांनी पथके तयार करून मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विमानतळावरील दुकानांची एकाच वेळी तपासणी केली. या तपासणीत पॅकबंद वस्तूंवर आवश्यक त्या सूचना न दिल्यामुळे तसेच छापील किमतीपेक्षा अधिक किंमत आकारल्यावरून मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद विमानतळावर प्रत्येकी तीन गुन्हे दाखल करण्यात आले. प्रवाशांच्या सामानाचे वजन करणाऱ्या यंत्रणेबाबतही चार खटले दाखल करण्यात आले. नागपूर येथील मिहान इंडिया प्रा. लि.विरुद्ध दोन खटले तर यंत्रणेच्या अचूकतेबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय पुणे विमानतळावरील वजन करणाऱ्या यंत्रणेबाबतही खटला दाखल करण्यात आला.

मुंबई येथे आठ तर पुण्यात चार आणि औरंगाबाद येथील विमानतळांवरील दोन वजनतोलन उपकरणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये नामांकित विमान कंपन्यांचा समावेश असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.