‘केवळ दिसायला चांगले आहात म्हणून काम मिळायचे दिवस गेले. तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर काम नक्कीच मिळेल. कुठल्याही क्षेत्रात पोकळ ‘ब्रॅण्डिंग’ फार काळ टिकत नाही. खऱ्या गुणवत्तेला आज सुगीचे दिवस आहेत. सध्याच्या युगात गुणवत्ताच महत्त्वाची आहे..’, अनेक सेलिब्रिटींना सल्ले देणाऱ्या ब्रॅण्ड मॅनेजर आणि आता ई-कॉमर्स क्षेत्रात उद्योजिका बनलेल्या ‘ब्रॅण्ड वूमन’ प्रीता सुखटणकर आपल्या कारकिर्दीचे गुपित उलगडत होत्या. निमित्त होते ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’चे. उद्योजिका प्रीता सुखटणकर यांनी या वेळी सेलिब्रिटी ब्रॅण्डिंगच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. ‘केसरी प्रस्तुत व्हिवा लाऊंज’ हा कार्यक्रम ‘दिशा डायरेक्ट’च्या सहकार्याने मंगळवारी दादरमध्ये झाला.
एका नियतकालिकासाठी काम करणारी तरुण मराठी मुलगी पुढे फॅशन पत्रकार झाली, पुढे कित्येक टेलिव्हिजन कार्यक्रमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यातून सेलिब्रिटी व्यवस्थापन आणि आता ऑनलाइन मार्केटिंग कंपनीची संचालक बनली. प्रीता यांचा हा थक्क करणारा प्रवास उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. ‘एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाताना आणि नवीन व्यवसाय सुरू करताना मी एकच सूत्र पाळले.. कुठलीही कल्पना मनात दाबून ठेवली नाही. मनातल्या संकल्पनांना मुक्त केले की आपल्याला आपला रस्ता सहज सापडतो,’ असे प्रीता यांचे सांगणे होते.
माध्यमे व व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी आजच्या नव्या युगाच्या या व्यवसायाबद्दल अनेक शंका प्रीता यांना विचारल्या. आपले करिअर निवडताना आता पुढे काय? हा प्रश्न साधारणपणे तरुणाईला पडलेला दिसतो. ‘नेहमीचे चाकोरीमधील विषय निवडायचे की, आपले कुंपण तोडून नवीन क्षितिजाचा शोध घ्यायचा, हा गोंधळ मनात कायम असतो. या गुंत्यात जास्त काळ अडकून न राहता मनात येईल त्या दिशेने भरारी घ्या’, असा सल्ला यावेळी प्रीता यांनी दिला. ‘कोणत्याही क्षेत्रात अपयश सहन करण्याची वेळ येतेच. पण अपयशाला घाबरून नवीन क्षेत्रात येणे टाळण्याऐवजी त्याचा आव्हान म्हणून स्वीकार करायला हवा. एमटीव्हीमधील सुस्थापित नोकरी सोडताना मी याच विचाराने नवीन क्षेत्र निवडले आणि पुढे स्वतचा व्यवसाय करतानाही धीटपणे त्यात उतरायचे ठरवले. नेमके हेच धैर्य आणि आत्मविश्वास मराठी मानसिकतेमध्ये नसतो’, असे परखड मत प्रीता यांनी नोंदवले.

आजचे वातावरण असुरक्षित
शक्ती मिलमधील बलात्काराची घटना हादरवून टाकणारी होती. एका कंपनीची संचालिका या नात्याने या प्रकरणाची मी बरीच धास्ती घेतली आहे. आमच्या क्षेत्रात रात्री उशीरापर्यंत काम करावेच लागते. पूर्वी मी स्वत रात्री ३ वाजता कामावरून घरी जातानासुद्धा भीती वाटत नसे. पण आता मात्र माझ्याकडे काम करणाऱ्या मुली कोणत्या वेळी, कुठे आणि काय घालून जात आहेत या बद्दल मी जास्त जागरुक राहू लागले आहे. मी माझ्या कारकिर्दीची सुरवात केली त्याकाळी जितके सुरक्षित वातावरण होते तेवढे सुरक्षित वातावरण आता नाही, असेही प्रीता यांनी यावेळी मांडले.

कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तान्त  १ ऑगस्टच्या ‘व्हिवा’मध्य़े