केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा मध्यम ते दीर्घकाळात देशासाठी फायदेशीर ठरेल. मात्र, कॅशलेस अर्थव्यवस्था म्हणजे खूप कमी वेळात भरपूर काही साध्य करायला बघण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध उद्योगपती अदि गोदरेज यांनी व्यक्त केली. ते ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर सविस्तरपणे भाष्य केले. जगातील कोणतीच अर्थव्यवस्था ही कॅशलेस नाही. जगभरातील विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांचाही विचार करायचा झाल्यास  त्यांच्याकडे ऑनलाईन व्यवहार मोठ्याप्रमाणावर होतात. मात्र, यामध्ये प्रत्यक्ष चलनाद्वारे होणाऱ्या व्यवहारांचा वाटाही महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे भारतात विशेषत: ग्रामीण भागाचा विचार करता मला कॅशलेस अर्थव्यवस्था आणणे खूपच अवघड वाटत असल्याचे अदि गोदरजे यांनी म्हटले.

काहीबाबतीत पैशाच्या व्यवहारांसाठी नव्याची कास धरणे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, रोकडही तितकीच महत्त्वाची आहे. नोटाबंदीनंतर सुरूवातीच्या काळात पुरेशी रोकड उपलब्ध होणे, फार गरजेचे होते. आपण तिथपर्यंत पोहचू, आपण तिथपर्यंत पोहचत आहोत, मात्र, हे सगळे लवकरात लवकर करणे चांगले ठरेल, असे त्यांनी म्हटले.

याशिवाय, वस्तू व सेवा कर कायद्यामुळेही काळ्या पैशाच्या निर्मितीला मोठ्याप्रमाणावर आळा बसेल. त्यामुळे अप्रत्यक्ष कर चुकवता येणार नाही. या माध्यमातूनच काळ्या पैशाची मोठ्याप्रमाणावर निर्मिती होते. मुळात थेट कराच्या चुकवेगिरीसाठीही अप्रत्यक्ष कराची चुकवेगिरी हेच मुख्य कारण असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, नोटाबंदीमुळे अल्पकाळात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उद्योग क्षेत्रातील किती व्यवहार रोखीने चालतात, याचा अंदाज सरकारला व्यवस्थितपणे घेता आला नाही. सरकार सध्या वैयक्तिक ग्राहकांच्या समस्येचे निराकरण करण्यामध्ये गुंतले आहे. मात्र, माझ्या मते सरकारने उद्योग क्षेत्राकडे विशेषत: ग्रामीण भागात रोखीने चालणाऱ्या व्यवहारांकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ही परिस्थिती योग्यपणे हाताळली तर व्यवहारांसाठी अन्य पर्यायाचा उपयोग करणे फायदेशीर ठरू शकते, असे मत अदि गोदरेज यांनी व्यक्त केले.