महापालिकेकडून नोटीस बजावण्याची कारवाई सुरूच
विहिरी, कूपनलिकांमधील पाण्याची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या टँकरचालकांवर नोटीस बजावण्याची कारवाई पालिकेने गुरुवारी सुरूच ठेवली होती. त्यामुळे टँकरचालकांनी गुरुवारी पुन्हा बेमुदत संपाचे हत्यार उगारले.
भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन विहिरी आणि कूपनलिकांमधील पाण्याची विक्री करणाऱ्या पाणीमाफियांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने विहिरी आणि कूपनलिकांवर पाणी भरणाऱ्या टँकरचालकांवर नोटिसा बजावण्यास सुरुवात केली होती. विहिरी व कूपनलिकांवरील पंप ४८ तासांमध्ये काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. नोटीस दिल्यानंतरही कार्यरत असलेल्या विहिरी व कूपनलिकांवरील पंप जप्त करण्याचा सपाटा पालिकेने लावला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून टँकरचालक संपावर गेले होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मध्यस्थी केल्यानंतर बुधवारी टँकरचालकांनी संप मागे घेतला होता. मात्र पालिकेने गुरुवारीही नोटिसा बजावणे सुरूच ठेवल्याने टँकरचालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संप पुकारला.
पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीतील दादर, शिवाजी पार्क, माहीम, धारावी आदी भागांत शुक्रवारी टँकरचालकांवर नोटिसा बजावण्यात आल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या टँकरचालकांनी सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला. त्यानंतर जप्त केलेले पंप परत करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दाखविली. मात्र पंप परत न घेता टँकरचालक संपावर गेले. त्यामुळे हॉटेल, रुग्णालये, रेल्वे आदींना फटका बसण्याची शक्यता आहे.
बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांसाठी २५० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र शुक्रवारी केवळ १०० टँकरमधून रेल्वेला पाणीपुरवठा करण्यात आला. हा संप शुक्रवारीही सुरू राहिल्यास मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.

पाणी ओतून दिले..
टँकरमधील पाणी रस्त्यात सोडून टँकरचालकांनी संप सुरू केला. महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसत असताना टँकरचालकांनी रस्त्यातच टँकरमधील हजारो लिटर पाणी सोडून दिल्याने मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.